किरकोळ वादातून एकाचा खून
By Admin | Published: June 26, 2017 01:43 AM2017-06-26T01:43:40+5:302017-06-26T01:43:40+5:30
वाहतुकीच्या किरकोळ वादातून एका वाहनधारकाने मध्यस्थी करणाऱ्या इसमाच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यात एक जण जागीच ठार झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वाहतुकीच्या किरकोळ वादातून एका वाहनधारकाने मध्यस्थी करणाऱ्या इसमाच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यात एक जण जागीच ठार झाला. तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. सलीम शमशाद खान असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी वाशी पोलिसांनी कोपरखैरणे येथून विनोद दरेकर (२३) आणि सुशांत जुनघरे (२७), दोघांना अटक केली आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप कांबळे हे उबेर कंपनीची व्हॅगनर गाडी घेऊन वाशी प्लाझा येथील उड्डाण पुलाजवळ प्रवासी घेण्यासाठी थांबले होते; परंतु ऐनवेळी त्यांचे भाडे रद्द झाल्याने चहा पिण्यासाठी त्यांनी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या टपरीकडे आपली गाडी वळविली. त्याच वेळी वाशी स्थानकाकडून मुंबईकडे भरधाव जाणाऱ्या इर्टिगा गाडीच्या समोर ही गाडी आली. त्यामुळे इर्टिगा गाडीचा चालक विनोद दरेकर, त्याचा मित्र सुशांत नामदेव जुनघरे आणि कांबळे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे आरोपींनी दिलीप याला गाडीबाहेर खेचून मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून जवळच चहा पीत असलेल्या सलीम शमशाद खान (२९, रा. कल्याण) आणि मोहसीन सलीम मोमीन (वय २७, रा. घणसोली) यांनी मध्यस्थी केली. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी कांबळे आणि मध्यस्थी करणाऱ्यांना बघून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे भयभीत झालेल्या कांबळे यांनी मध्यस्थी करणाऱ्या दोन युवकांना टोलनाक्यापर्यंत सोबत येण्याची विनंती केली. त्यानुसार मध्यस्थी करणारे मोहसीन आणि सलीम हे दोघे आपल्या स्कुटीवरून कांबळे याच्या गाडीच्या मागे टोलनाक्याच्या दिशेने निघाले. वाशीगाव येथे आले असताना, मागावर असलेल्या इर्टिगा गाडीतील आरोपींनी स्कुटीला जोरदार धडक दिली. यात सलीम खान हा जागीच ठार झाला. तर मोहसीन मोमीन हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, ठोकर लागल्याने आरोपीची इर्टिगा गाडी शेजारच्या दुभाजकावर आदळल्याने ती बंद पडली. त्यामुळे आरोपींनी गाडी तेथेच सोडून पळ काढला. या गुन्ह्याची माहिती मिळताच वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध माहितीच्या आधारे अवघ्या चार तासांत दोन्ही आरोपींना कोपरखैरणे येथून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.