महिलेच्या हत्येप्रकरणी एक संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 05:28 AM2020-03-05T05:28:59+5:302020-03-05T05:29:04+5:30
रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू होती. मात्र, पोलिसांकडून अद्याप त्यासंबंधीची माहिती उघड करण्यात आलेली नाही.
नवी मुंबई : अपहरण करून महिलेची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू होती. मात्र, पोलिसांकडून अद्याप त्यासंबंधीची माहिती उघड करण्यात आलेली नाही. पतीसोबत समारंभाला चाललेल्या महिलेचे रस्त्यालगत उभ्या कारसह अपहरण करून हत्या झाल्याची घटना उलवेत घडली होती. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण ताब्यात घेऊन त्याद्वारे तपासावर भर दिला आहे, त्याकरिता गुन्हे शाखेसह परिमंडळ पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आहे. प्रभावती भगत (५५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे अपहरण करून गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या हत्येमागे इतर काही वेगळे कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यानुसार सखोल तपासादरम्यान बुधवारी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
त्याची रात्री उशिरापर्यंत नेरुळ पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती. या दरम्यान पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांकडूनही ताब्यात घेतलेल्या संशयिताची सखोल चौकशी सुरू होती. दरम्यान, या प्रकारामुळे उलवे, बेलापूर परिसरांतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.