पेणमध्ये ‘एक गाव एक मिरवणुकी’ची प्रथा
By Admin | Published: September 15, 2016 02:30 AM2016-09-15T02:30:57+5:302016-09-15T02:30:57+5:30
बाप्पांच्या आगमनाने व दहा दिवस सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी माध्यान्हाची आरती होऊन सगळीकडे बाप्पांच्या मिरवणुकांचा थाटमाट रंगणार आहे
पेण : बाप्पांच्या आगमनाने व दहा दिवस सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी माध्यान्हाची आरती होऊन सगळीकडे बाप्पांच्या मिरवणुकांचा थाटमाट रंगणार आहे. महानगरीय व शहरी भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहसंकुले तथा खासगी गणेशभक्तांकडून गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका काढल्या जातात, मात्र याचा अपवाद असतात गावाकडील मंडळी. पेणच्या प्रत्येक गावात गावाची एक गाव एक मिरवणूक काढून वारकरी भजन मंडळी टाळ-मृदुंगाच्या अभंगवाणीने गणरायाला भावपूर्ण निरोप देतात. लोकमान्यांचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे उद्दिष्ट गावागावात सांघिक एकता-अखंडता राखून करण्यावरच ग्रामीण संस्कृतीचा बाज आहे.
पेणमधील तब्बल पाच जिल्हा परिषद मतदार संघातील १७२ गावांमध्ये पारंपरिक पध्दत पूर्वापार चालत आली आहे. एक गाव एक गणपती विसर्जन मिरवणुकीप्रसंगी गावोगावीची भजनी मंडळे गावातल्या प्रत्येक वाड्यात जाऊन घराघरातले गणरायांना घरची प्रमुख मंडळी श्रींची मूर्ती डोक्यावर घेऊन पाड्यातील एकत्रित गणरायांच्या मूर्तींना टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत-गाजत घेऊन गावातल्या सार्वजनिक तलाव, नदीतट अथवा खाडीपात्रातील विसर्जन स्थळावर नेतात. गावातले सगळे गणपती विसर्जन स्थळी आल्यावर तिथे भजन, युवा मंडळींची नाचगाणी असा तब्बल तासभर भक्तिभाव सोहळा रंगतो. सर्वांचीच गणरायाजवळ पीक -पाणी, सुबत्ता व संकट निवारणाची एकत्रित मागणी मनोभावे केली जाते. शेवटी विसर्जन स्थळावर शेवटची सामूहिक आरती होऊन श्रींच्या मूर्तीला विसर्जनाला प्रारंभ होतो.
गावातली पट्टीची पोहणारी पुरूष व युवा मंडळी या सर्व मूर्तींचे विधिवत विसर्जन करतात. यावेळी ‘गणपती बाप्पा, मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशी मोठी ललकारी गुंजते. विसर्जन झाल्यावर पाटावर नदीपात्रातील अथवा तलावातील माती घेऊन पुन्हा भजनी मंडळे पार्वती नंदना मोरया गजानना गजानना या घोषणांसह गावात परतात. या ग्रामीण संस्कृतीचा बाज गणेशोत्सवात आजही पहावयास मिळतो. दूरवर नोकरी-धंद्यानिमित्त गेलेले गावचे युवक, पुरूष मंडळी या निमित्ताने एकत्र येतात.
बाप्पांच्या दहा दिवसांच्या सहवासात जीवनातला आनंद, एकमेकांची सुख दु:खे, वर्षातील इतर कार्यक्रमाचे नियोजन गणेशोत्सवात होते. गावात श्रींच्या मूर्तीची संख्या जरी मोठी असली तरीही एक गाव, एक मिरवणूक हा उत्सवाचा फंडा कायम आहे. शहरातील वेगवेगळ्या विसर्जन मिरवणुकांचा माहोल पेणमध्ये गुरुवारी पाहता येणार आहे. (वार्ताहर)