पनवेलमध्ये वन-वे नावालाच; शहरातील घडी विस्कटली, नागरिकांसह वाहतूक पोलीस जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:20 PM2021-02-24T23:20:01+5:302021-02-24T23:20:12+5:30
नागरिकांसह वाहतूक पोलीस जबाबदार
वैभव गायकर
पनवेल : पनवेल शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा पनवेल शहरात असल्याने दिवसेंदिवस वाढती वाहने, अरुंद रस्ते यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे शहरातील वनवे केवळ नावालाच उरला असून नागरिकदेखील सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत आहेत.
शहरातील जय भारत नाका परिसरात केवळ वनवेचा बोर्ड लागला आहे. मात्र नियमांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.
जय भारत नाका येथील वनवेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दुचाकीस्वाराला २०० व चारचाकी वाहनाला ३०० रुपये दंड आहे. मात्र वाहतूक पोलीस या ठिकाणी फिरकत नसल्याचे चित्र दिसत आहे. पनवेल शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती, पालिका मुख्यालय, न्यायालये, तलाठी कार्यालय, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त कार्यालय, दोन पोलीस ठाणी, पंचायत समिती कार्यालय तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारी दुकाने आहेत. यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा शहरात असते.
शहरातील अरुंद रस्त्यांबाबत पालिकेने अद्यापही मास्टर प्लॅन तयार केला नसल्याने कित्येक वर्षे जुन्या अरुंद रस्त्यावरून वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. मागील वर्षात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात आहेत. शहरातील पार्किंगसाठी भूखंड अपुरे आहेत. त्यातच मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग केली जात असल्याने वाहतुकीची समस्या शहरात गंभीर होत चालली आहे.