गोवा-मुंबईदरम्यान उद्या एकमार्गी विशेष रेल्वे; कोकण रेल्वेने परतणाऱ्यांसाठी दिवाळी भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 01:18 PM2024-10-31T13:18:50+5:302024-10-31T13:18:59+5:30
दिवाळीमुळे सध्या कोकण रेल्वेच्या बहुसंख्य गाड्या हाउसफुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे गाड्यांमध्ये अतिरिक्त अनारक्षित प्रवाशांची गर्दी वाढते आहे.
नवी मुंबई : दिवाळीच्या सुट्यांमध्ये फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून आता विविध मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १ नोव्हेंबर रोजी गोव्यावरून थेट मुंबईसाठी एकमार्गी विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.
दिवाळीमुळे सध्या कोकण रेल्वेच्या बहुसंख्य गाड्या हाउसफुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे गाड्यांमध्ये अतिरिक्त अनारक्षित प्रवाशांची गर्दी वाढते आहे. हे लक्षात घेऊन कोकण रेल्वेने १ नोव्हेंबर रोजी मडगाव-मुंबई सीएसएमटी (०२०५२) ही विशेष एकमार्गी गाडी सुरू होणार आहे. या गाडीमुळे कोकणातून मुंबईला परतणाऱ्या, तसेच पर्यटकांची विशेष सोय होणार आहे.
व्हिस्टा डोमसह १६ डबे
ही गाडी सकाळी ८ वाजता मडगाव जंक्शन येथून सकाळी ८ वाजता सुटेल. तर त्याच दिवशी सायंकाळी ७:२० मिनिटांनी ती मुंबई सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल. या गाडीत व्हिस्टा डोमसह एकूण १६ कोच असणार आहे. थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर ती थांबेल, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.