एपीएमसीतील कांदा - बटाटा मार्केट स्थलांतराचा पेच कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 11:17 PM2019-05-27T23:17:01+5:302019-05-27T23:17:09+5:30
एपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केटमधील व्यवहार १ जूनपासून थांबविण्याची नोटीस प्रशासनाने दिली आहे.
नवी मुंबई : एपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केटमधील व्यवहार १ जूनपासून थांबविण्याची नोटीस प्रशासनाने दिली आहे. मुदत संपण्यासाठी चार दिवस शिल्लक असून अद्याप स्थलांतरासाठी प्रशासनाने ठोस पर्यायी व्यवस्थाच केलेली नाही. यामुळे मार्केट बंद केल्यास व्यापार कुठे करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने ठोस पर्यायी व्यवस्था करूनच मोडकळीस आलेल्या मार्केटचा वापर थांबवावा अशी भूमिका माथाडी संघटनेनेही घेतली आहे.
मुंबई बाजार समितीची स्थापना झाल्यानंतर मुंबईमधील कृषी व्यापार नवी मुंबईमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९८१ मध्ये कांदा - बटाटा मार्केटचे स्थलांतर झाले. पण २० वर्षांमध्ये इमारतीच्या स्लॅबला तडे जावू लागले. महापालिकेने २००३ मध्ये काही विंग धोकादायक घोषित केल्या व नंतर संपूर्ण मार्केटच अतिधोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले. मार्केट पुनर्बांधणीचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला असताना प्रशासनाने १ जूनपासून येथील सर्व व्यवहार बंद करण्याची नोटीस व्यापाऱ्यांना दिली आहे.
मार्केटमधील आवक थांबविण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. व्यापारासाठी मॅफ्को मार्केटच्या मागील बाजूचा भूखंड व लिलावगृहामध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मोकळ्या भूखंडावर १४० व लिलावगृहामध्ये ९० व्यापाऱ्यांची सोय करण्यात येणार आहे, परंतु व्यापार थांबविण्यासाठी दिलेली मुदत संपत आल्यानंतरही अद्याप पर्यायी जागेवर काहीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
मार्केटमध्ये रोज २५० ते ३५० ट्रक व टेम्पोमधून कांदा, बटाटा व लसूणची आवक होत असते. जवळपास ४०० टेम्पोमधून हा माल मुंबईमध्ये विक्रीसाठी जात असतो. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केलेल्या भूखंडावर प्रत्येक व्यापाºयाला जास्तीत जास्त २०० चौरस फुटाची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जागेवर कृषी माल ठेवणेही शक्य होणार नाही. माल ठेवण्यासाठीही जागा नसेल तर व्यापार कसा व कुठे करायचा असा प्रश्न व्यापाºयांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी न्यायालयातही धाव घेतली आहे. प्रशासनाने मार्केट बंद करण्याची घाई करू नये अशी मागणीही केली आहे. मार्केटमधील व्यवहार थांबविले तर माथाडी कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होणार आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियननेही प्रशासनाला पत्र दिले आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना सर्व घटकांना विश्वासात घेण्यात यावे. सक्षम पर्यायी व्यवस्था केल्यानंतरच मार्केट स्थलांतर केले जावे. घाई करून निर्णय घेतल्यास व त्यामुळे कामगार व मार्केटचे नुकसान झाल्यास त्याला पूर्णपणे बाजार समिती प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला आहे. याविषयी बाजार समिती सचिव अनिल चव्हाण यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला, परंतु संपर्क होवू शकला नाही.
>भूखंडावर डेब्रिजचे ढिगारे
एपीएमसीने १४० व्यापाºयांची पर्यायी व्यवस्था मॅफ्को मार्केटच्या मागील बाजूच्या भूखंडावर करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या भूखंडावर सद्यस्थितीमध्ये काहीही उपाययोजना केलेली नाही. जुन्या इमारती पाडून त्याचे डेब्रिज भूखंडावर अंथरण्यात आले आहे. याठिकाणी व्यापारासाठी आवश्यक रचना व शेड उभे करण्यासाठी काही महिने लागण्याची शक्यता आहे. यामुळे पर्यायी व्यवस्था केली असल्याचा प्रशासनाचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने व्यापाºयांना १० ते १५ दिवसांची मुदत देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु यावेळेतही पर्यायी व्यवस्था होवू शकणार नाही अशी प्रतिक्रिया व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.
>कांदा - बटाटा मार्केटमधील व्यापार १ जूनपासून थांबविण्याचे पत्र प्रशासनाने व्यापाºयांना दिले आहे, परंतु प्रत्यक्षात सक्षम पर्यायी व्यवस्था केलेली नाही. पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय मूळ मार्केटमधील कामकाज थांबवू नये. सर्वांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्यास पुढील परिणामांना पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील.
- रविकांत पाटील,
संयुक्त सरचिटणीस,महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन