एपीएमसीतील कांदा - बटाटा व्यापाऱ्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 11:32 PM2019-05-30T23:32:31+5:302019-05-30T23:32:45+5:30
मार्केट सुरूच राहणार : १५ जूनपर्यंत कोणतीही कारवाई नाही; न्यायालयाच्या आदेशाकडे लक्ष
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा - बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांना अल्प दिलासा मिळाला आहे. १५ जूनपर्यंत येथील व्यवहार बंद न करण्याचा निर्णय घेतला असून, न्यायालय काय आदेश देणार त्यावर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
कांदा - बटाटा मार्केट धोकादायक घोषित करण्यात आले आहे. पावसाळ्यात मार्केट कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता असल्यामुळे १ जूनपासून येथील व्यवहार थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. व्यापाºयांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. मार्केट बंद करण्याची तारीख जवळ आल्यानंतरही पर्यायी व्यवस्था झाली नसल्यामुळे व्यापारी हवालदिल झाले होते. यामुळे सर्वप्रथम पर्यायी व्यवस्था करण्यात यावी व नंतर मूळ मार्केटचा वापर थांबविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापाºयांनी केली होती.
मार्केटमधील प्रश्न सोडविण्यासाठी गुरुवारी बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण यांनी व्यापारी संघटनेबरोबर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. १ जूनला तडकाफडकी मार्र्केट बंद करू नये अशी भूमिका मांडण्यात आली. प्रशासनानेही त्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. १५ तारखेपर्यंत मार्केट सुरूच ठेवले जाणार आहे. या विषयी व्यापाºयांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे व्यापाºयांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मीटिंगविषयी माहिती घेण्यासाठी प्रशासक व सचिवांशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.
पर्यायी व्यवस्थेची गरज
कांदा-बटाटा मार्केटमुळे जवळपास पाच हजार नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. मार्केट १ जूनपासून बंद करण्याची चर्चा सुरू झाल्यामुळे माथाडी कामगारांसह अनेकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यामुळे जोपर्यंत मार्केटसाठी पर्यायी व्यवस्था होणार नाही तोपर्यंत मूळ मार्केट बंद करू नये, अशी भूमिका माथाडी संघटनेनेही घेतली आहे.