राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची घसरण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 05:20 AM2019-12-12T05:20:07+5:302019-12-12T05:20:35+5:30
मुंबईमध्ये तुर्कीवरूनही कांद्याची आवक
- नामदेव मोरे
नवी मुंबई : राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याचे दर नियंत्रणामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई व सोलापूर वगळता इतर बाजारपेठेमध्ये कमाल दर १०० पेक्षा कमी झाले आहेत. मुंबईमध्ये गुजरात, मध्यप्रदेशसह इजिप्त व तुर्कीवरूनही कांदा विक्रीसाठी येऊ लागला असून, बुधवारी प्रतिकिलो ४० ते १०० रुपये दराने कांद्याची विक्री झाली.
राज्यभर सर्वत्र गत आठवड्यामध्ये कांद्याचे दर १३० रुपये किलोवर गेले होते. सोलापूरमध्ये एक दिवस प्रतिकिलोला २०० रुपये विक्रमी भावही मिळाला होता; परंतु नवीन कांद्याची आवक वाढल्यामुळे दरांची घसरण सुरू झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये बुधवारी ६६० टन आवक झाली आहे. आवक कमी होऊनही दर स्थिर राहिले आहेत. एक महिन्यापासून इजिप्तवरूनही नियमितपणे कांदा विक्रीसाठी येत आहे. बुधवारी तुर्कीवरील कांदाही मार्केटमध्ये आला असून, तो ६५ ते ७५ रुपये किलो दराने विकला जात होता.
मुंबईत दर चांगले भेटत असल्यामुळे गुजरात व मध्यप्रदेशमधूनही येथे कांदा विक्रीसाठी पाठविला जात आहे. मुंबईप्रमाणे राज्यभर कांद्याची घसरण सुरू आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये प्रतिकिलो २ ते १०० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. दोन बाजार समिती वगळता इतर कुठेही १०० रुपये दर मिळू शकला नाही. राज्यातील विविध बाजार समितीमध्ये बुधवारी ११ हजार ११३ टन कांद्याची आवक झाली.
सोलापूर बाजारसमितीमध्ये सर्वाधिक ३,५०८ टन आवक झाली आहे. आवक नियमितपणे सुरू झाली तर दर स्थिर राहतील, अन्यथा पुन्हा कांद्याचे दर वाढतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईमध्ये या आठवड्यामध्ये दर नियंत्रणामध्ये आले आहेत. प्रतिकिलो ४० ते १०० रुपये दराने विक्री होत आहे. पुणे व नाशिकमधून मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून, परराज्यातील मालही विक्रीसाठी येत आहे. बुधवारी तुर्कीचा मालही विक्रीसाठी आला आहे.
- सुरेश शिंदे, कांदा व्यापारी, मुंबई