लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कांदा निर्यातीवरील निर्बंधामुळे राज्यभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोमवारी लिलाव बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, नाशिक, अहमदनगर व इतर ठिकाणांवरून दिवसभरात १,४०५ टन कांद्याची आवक झाली.
बाजार समितीमध्ये ८ ते २२ रुपये प्रतिकिलो दराने कांद्याची विक्री झाली. शनिवारीही १,०५९ टन आवक झाली होती. राज्यातील काही बाजार समित्यांमधील व्यवहारांवर परिणाम झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मुंबईला कांदे विक्रीस आणले. शनिवारी कांदा ९ ते २३ रुपये दराने विकला जात होता. प्रतिकिलो दर एक रुपयाने कमी झाले.
भाजीपाल्याचे दरही झाले कमी
मुंबई बाजार समितीमध्ये सोमवारी ७२५ वाहनांमधून ३ हजार ८३ टन भाजीपाल्याची आवक झाली. बहुतांश सर्वच भाज्यांचे दर कमी झाले आहेत. टोमॅटो ३२ ते ४०, वाटाणा ४० ते ५०, फरसबी ४० ते ५५, कोबी १५ ते २०, फ्लॉवर १४ ते १८ रुपये किलो दराने विकले जात होते. मिरची २८ ते ३२, कोथिंबीर ६ ते ८, मेथी ६ ते ८, पालक ६ ते ७ व शेपू ६ ते ८ रुपये किलो दराने विकले जात होते.