कांदा-बटाटा मार्केटची इमारत धोकादायक; व्यापारी, माथाडी कामगारांचा जीव मुठीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 12:32 AM2020-07-18T00:32:28+5:302020-07-18T00:33:00+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट मुंबईवरून नवी मुंबईमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने ऐंशीच्या दशकात घेतला.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : शहरातील अतिधोकादायक इमारतींमध्ये एपीएमसीमधील कांदा-बटाटा मार्केटचाही समावेश आहे. पुनर्बांधणी रखडल्यामुळे येथील व्यापारी, माथाडी कामगार व इतर घटकांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. पावसाळ्यात अपघाताची शक्यता वाढली असून, मुंबईसारखी एखादी दुर्घटना घडली, तर जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट मुंबईवरून नवी मुंबईमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने ऐंशीच्या दशकात घेतला. १८८१ मध्ये सर्वप्रथम कांदा-बटाटा मार्केट स्थलांतरित करण्यात आले. ७.९२ हेक्टर जमिनीवर २४३ गाळे उभारण्यात आले, परंतु वीस वर्षांत मार्केटमधील अनेक गाळ्यांचे प्लास्टर कोसळू लागले. नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वप्रथम काही विंग व नंतर संपूर्ण मार्केटच धोकादायक घोषित केले आहे.
मार्केटचा वापर थांबविण्याच्या सूचना बाजार समिती प्रशासन व व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. प्रशासनाने मार्केटची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने ही पुनर्बांधणी करण्यास परवानगी दिली आहे, परंतु विविध कारणांमुळे पुनर्बांधणीचे काम रखडत गेले व धोकादायक इमारतींमध्येच व्यापार सुरू ठेवण्यात आला. गतवर्षी मार्केट खाली करण्याच्या नोटीस प्रशासनाने दिल्या होत्या.
मॅफ्को मार्केटजवळील मोकळ्या भूखंडावर तात्पुरते शेड उभारून, व्यापार तेथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु तेथे जागा अपुरी असल्याने व्यापाऱ्यांनी शासनाकडे विनंती केली व पुन्हा आहे तेथेच व्यापार सुरू करण्यात आला. यामुळे या धोकादायक इमारतीत काम करताना कामगार, व्यापारी हे जीव मुठीत घेऊनच वावरत असल्याचे दिसून येत आहे.
दररोज पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांची ये-जा
सद्यस्थितीमध्ये कांदा-बटाटा मार्केटमध्ये व्यापारी, माथाडी कामगार, ग्राहक, वाहतूकदार व इतर सर्व मिळून दररोज पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांची ये-जा सुरू असते.
मार्केटचा काही भाग कोसळला, तर अनेकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. मार्केटची स्थिती गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी टेकू लावण्यात आले आहेत. प्लास्टरच्या आतील लोखंड बाहेर दिसू लागले आहे. अनेक ठिकाणी पिलर्सला तडे गेले आहेत.
मालाची चढ-उतार करणाºया धक्क्याची दुरवस्था झाली आहे. गटारांमधून पाण्याचा निचरा होत नाही. अनेक ठिकाणी पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. कोणत्याही क्षणी बांधकाम कोसळेल, अशी परिस्थिती असून, शासन व प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही, तर दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कांदा-बटाटा मार्केटमधील इमारती महानगरपालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत. गेल्या वर्षी मार्केट मोकळे करण्यात येणार होते, परंतु शासनाने त्यास स्थगिती दिलेली आहे. पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही प्रयत्न सुरू आहेत. धोकादायक ठिकाणी व्यापाºयांनी तात्पुरती दुरुस्तीही केली आहे.
- अनिल चव्हाण,
सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती