कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी १०० दिवसामध्ये मार्गी लावणार, पणनमंत्री अब्दूल सत्तार यांची पाहणी
By नामदेव मोरे | Published: August 23, 2023 07:55 PM2023-08-23T19:55:18+5:302023-08-23T19:55:18+5:30
धोकादायक मार्केटची केली पाहणी
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अतीधोकादायक कांदा - बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा प्रश्न १०० दिवसामध्ये मार्गी लावणार. व्यापारी व प्रशासन सर्वांना विश्वासात घेऊन पुनर्बांधणीचे काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन पणनमंत्री अब्दूल सत्तार यांनी दिले आहे.
व्यापारी, कामगार व मार्केटमधील समस्या समजून घेण्यासाठी अब्दूल सत्तार यांनी बाजार समितीला भेट दिली. प्रशासनासह व्यापारी संघटनांशी चर्चा केल्यानंतर प्रत्यक्ष मार्केटची पाहणी केली. कांदा- बटाटा मार्केटमध्ये ठिकठिकाणी टेकू लावण्यात आले आहेत. छताचे प्लास्टर निखळले आहे. पिलरलाही तडे गेले आहेत.
धक्यांच्या वरील छताचे प्लास्टर वारंवार कोसळत आहे. मार्केटची अवस्था पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली. कोणत्याहीक्षणी मार्केट कोसळण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेनेही मार्केट धोकदायक घोषीत केले आहे. मार्केटची पुनर्बांधणी करण्यासाठी एक महिन्यात सर्व घटकांशी चर्चा करून ठोस निर्णय घेतला जाईल व पुढील १०० दिवसांमध्ये पुनर्बांधणीच्या विषयावर तोडका काढला जाईल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट याठिकाणी उभारण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
कांदा बटाटा मार्केटबरोबर फळ, मसाला, भाजीपाला व धान्य मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या समस्याही समजून घेतल्या. पाचही मार्केटमधील प्रश्न सोडविण्यासाठी गुरूवारी ३० ऑगस्टला मंत्रालयात बैठकी आयोजीत केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सभापती अशोक डक, सचीव राजेश भुसारी, निलेश विरा, विजय भुत्ता, संजय पिंगळे, बाळासाहेब बेंडे उपस्थित होते. व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांसमोरील अडचणी मांडल्या. मार्केटमध्ये एक नियम व मार्केट बाहेर दुसरा नियम नको. सर्वांना नियमन लागू करा किंवा आम्हालाही नियमनातून वगळा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.
व्यापाऱ्यांचे आंदोलन मागे
कांदा -बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी गुरूवारी २४ ऑगस्टला एक दिवसाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पणन मंत्र्यांनी मार्केटला भेट देवून चर्चा केल्यानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.