नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी मार्केटबाहेर रोडवरच कांदा-बटाट्याचे अनधिकृत मार्केट सुरू झाले आहे. रस्ता आडवून सुरू केलेल्या बाजारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असून तक्रार करूनही महानगरपालिका, पोलीस व एपीएमसी प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.राज्य शासनाने भाजीपाला व फळे नियमणमुक्त केली आहेत. बाजारसमितीच्या बाहेर कोठेही व्यापार करता येईल, असे स्पष्ट केले आहे. शासनाच्या या निर्णयाचा गैरअर्थ घेऊन ४० ते ५० व्यापाऱ्यांनी चक्क भाजी मार्केट व विस्तारित मार्केटबाहेर तळ ठोकला आहे. रोड व पदपथ अडवून कांदा, बटाट्याची अवैधपणे विक्री सुरू केली आहे. रोज किमान ३० ते ४० टन मालाची या ठिकाणी विक्री होत आहे. विस्तारित मार्केट व मूळ मार्केटला जोडणाºया रोडवर या विक्रेत्यांसह खाद्यपदार्थ बनविणाºयांनी अतिक्रमण केले आहे. येथून ये-जा करणेही अशक्य होत आहे. याविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने काही दिवस कारवाई केली होती; पण व्यापाºयांशी अर्थपूर्ण तडजोडी केल्यानंतर पुन्हा विक्री सुरू करण्यात आली आहे. अनधिकृत मार्केटमुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. विक्रेते बाजारसमितीच्या सुरक्षारक्षकांनाही दमदाटी करत आहेत. यापूर्वी सुरक्षारक्षकांनी अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दिल्या आहेत.अनधिकृतपणे सुरू असलेल्या व्यापाराविरोधात तक्रारी केल्यानंतरही कोणीच ठोस कारवाई करत नाही. आमच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर हा व्यापार होत असल्याचे कारण बाजारसमितीचे अधिकारी देत आहेत. पोलीस प्रशासन कारवाई करण्याचे अधिकार एपीएमसी व महापालिकेचे असल्याचे कारण देऊन जबाबदारी झटकत आहेत.महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी या मार्केटकडे फिरकतच नाहीत. हा व्यापार सकाळच्या सत्रात होत असल्याचे कारण दिले जात आहे; परंतु प्रत्यक्षात ११ वाजल्यानंतरही येथे विक्री सुरू असते. शिवाय, विक्री करून राहिलेल्या शेकडो गोणी माल येथेच दिवसभर ठेवला जातो. त्यावरही काहीच कारवाई केली जात नसल्यामुळे बाजारसमितीमधील व्यापाºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अनधिकृतपणे रोडवर कांदा-बटाटा मार्केट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 6:23 AM