माथाडींनी धडक देताच कांदा-बटाटा मार्केटचे पाणी सुरू; कामगार समाधानी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 06:14 AM2024-06-25T06:14:28+5:302024-06-25T06:14:46+5:30
हमीपत्र देण्याच्या अटीवर पुरवठा झाला पूर्ववत; कामगार समाधानी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : इमारत धोकादायक असल्याने खबरदारीची म्हणून नवी मुंबई पालिकेने येथील एपीएमसी मार्केटच्या कांदा-बटाटा मार्केटसह सुविधा इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे २० जूनपासून माथाडी कामगारांसह व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी माथाडी नेते नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी थेट महापालिका मुख्यालयावर धडक दिली. त्यावेळी झालेल्या चर्चेअंती व्यापारी हमी पत्र देण्याच्या अटीवर पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठा सुरू केला.
मार्केट परिसरात व्यापारी, माथाडी कामगार मिळून पाच हजार लोक काम करतात. या सर्वांचे पाण्यावाचून प्रचंड हाल सुरू होते. त्यात विशेषत: महिला कामगार, ग्राहकांची तर मोठी कुचंबणा होत होती. मात्र, एपीएमसी प्रशासनाने आपली जबाबदारी झटकून महापालिकेकडे बोट दाखविले होते.
शिंदेसेनेनेही प्रशासनाला धरले धारेवर
कांदा-बटाटा मार्केटची इमारत धोकादायक झाल्याचे कारण पुढे करून महापालिकेने पाणीपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे येणाऱ्या अडचणी व्यापाऱ्यांनी शिंदेसेनेचे उपनेते विजय नाहटा यांना सांगितल्या. त्यानुसार नाहटा यांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली.
‘दुर्घटना घडल्यास आम्हीच जबाबदार’
- कांदा-बटाटा मार्केटची इमारत अतिधोकादायक झाली आहे. यामुळे पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी शासनाच्या नियमानुसार पाणीपुरवठा खंडित केल्याचे आयुक्त कैलास शिंदे यांनी माथाडी नेत्यांना सांगितले.
- त्यानंतर मार्केटमधील प्रत्येक व्यापाऱ्याने आपला गाळा क्रमांक लिहून पावसाळ्यात दुर्दैवाने एखादी दुर्घटना झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहू, असे हमीपत्र लिहून दिल्यास पाणीपुरवठा त्वरित सुरू, असे सांगितले. आयुक्तांची अट माथाडी कामगारांनी मान्य केली असून, येत्या दोन दिवसांत हमी पत्र द्यायचे आहे. बैठक संपल्यानंतर लगेच पाणीपुरवठा सुरू झाल्याने व्यापारी आणि माथाडींनी आनंद व्यक्त केला आहे.