बाजार समितीमध्ये कांद्याने गाठली पन्नाशी; किरकोळ मार्केटमध्ये ६० रुपये किलो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 01:18 AM2020-10-14T01:18:02+5:302020-10-14T01:18:17+5:30
पाऊस सुरूच राहिल्यास दर वाढण्याची शक्यता
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली असून दर वाढू लागले आहेत. मंगळवारी होलसेल मार्केटमध्ये कांदा ३५ ते ५० रुपये किलो दराने विकला गेला असून, किरकोळ मार्केटमध्ये प्रतिकिलो ५० ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
बाजार समितीमध्ये सोमवारी ६३१ टन कांद्याची आवक झाली होती. होलसेल मार्केटमध्ये कांदा ३० ते ४५ रुपये किलो दराने विकला गेला होता. परंतु मंगळवारी फक्त ४२५ टनच आवक झाली. परिणामी कांद्याचे दर वाढून ३५ ते ५० रुपये झाले आहेत.
दरवाढीमुळे पन्नाशी गाठल्याचा परिणाम किरकोळ मार्केटमध्येही होऊ लागला आहे. राज्यातील इतर अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याने पन्नाशी गाठली आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्यामुळे दर वाढत आहेत. मुंबईमध्ये सद्यस्थितीमध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे परिसरातून कांद्याची आवक होत आहे. परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाने फटका दिल्यास कांद्याचा दर वाढण्याची शक्यता असून दिवाळीपर्यंत तेजी कायम राहील अशी माहिती कांदा-बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळूंज यांनी दिली आहे.