लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मुंबई बाजार समिती शुक्रवार व रविवार दोन दिवस बंद असल्याचा परिणाम कांदा पुरवठ्यावरही झाला आहे. होलसेल मार्केटमध्ये दर ६० रुपयांवर पोहोचले आहेत. नवी मुंबईमध्ये किरकोळ मार्केटमध्ये कांदा ८० रुपयांवर पोहोचला असून, वाशी सेक्टर १७ मधील उच्चभ्रू वसाहतीमधील मार्केटमध्ये प्रतिकिलो १०० रुपये दराने कांद्याची विक्री झाली.
देशभर कांद्याच्या दराने उसळी घेतली आहे. रविवारी कामकाज सुरू असलेल्या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर २५ ते ६० रुपये किलोवर पोहोचले आहेत.
मार्केट बंदचा बसला फटका
मुंबई बाजार समिती शुक्रवारी कामगारांच्या संपामुळे बंद होती. रविवारी साप्ताहिक सुट्टी होती. सुट्टीचा किरकोळ मार्केटमधील पुरवठ्यावर परिणाम झाला.
आज ठरणार पुढील दर
सीबीडी, नेरुळ, सानपाडा, कोपरखैरणे परिसरातील किरकोळ मार्केटमध्ये कांदा ८० रुपये किलो दराने विकला जात होता. वाशी सेक्टर १७ मधील भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याचे दर १०० रुपयांवर पोहोचले होते. सोमवारी बाजार समितीमध्ये किती आवक होणार यावर पुढील दर अवलंबून राहणार आहेत. पुरेशी आवक झाली नाही तर सर्वच किरकोळ मार्केटमध्ये कांदा शंभरी गाठण्याची शक्यता आहे.