किरकोळ मार्केटमध्ये कांदा ६० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:05 AM2019-09-20T06:05:37+5:302019-09-20T06:05:42+5:30
राज्यभर कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये गुरुवारी फक्त ५० ट्रकचीच आवक झाली
नवी मुंबई : राज्यभर कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये गुरुवारी फक्त ५० ट्रकचीच आवक झाली असून होलसेल मार्केटमध्ये दर ३७ ते ४५ रुपये किलो झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात असून पुढील काही दिवसांमध्ये हे दर अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यभर सुरू असलेल्या पावसाचा परिणाम कांदा उत्पादनावरही होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवीन पीक येण्यास विलंब होणार आहे. कर्नाटकमधून येणारा लांब कांदाही अद्याप मुंबईमध्ये आलेला नाही. या सर्वांचा परिणाम बाजारभावावर होऊ लागला आहे. गुरुवारी मुंबईमध्ये जेमतेम ५० वाहनांचीच आवक झाली. फक्त ८२६ टन कांदाच विक्रीसाठी आला आहे. आवक ५० टक्के घसरल्याने दर मोठ्या प्रमाणात वाढले.
होलसेल मार्केटमध्येच कांद्याची ३७ ते ४५ रुपये किलो दराने विक्री झाली. नवी मुंबईमधील किरकोळ मार्केटमध्ये कांदा ५० ते ६० रुपये किलो दराने विकला जात होता. कांद्याचा तुटवडा सुरूच राहिला तर पुढील काही दिवसांमध्ये भाव अजून वाढतील, अशी शक्यताही येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईमध्ये पुणे व नाशिक परिसरातून कांद्याची आवक होत आहे. पुणे बाजार समितीमध्येही कांदा २५ ते ३८ रुपये किलो दराने विकला जात आहे. नाशिकमध्ये २३ ते ४७ रुपये व लासलगावच्या दोन्ही बाजारपेठेमध्ये १५ ते ४६ रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे.
कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्येच दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे त्याचा परिणाम मुंबईवरही मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये मुंबई बाजार समितीमधील दरही आणखी वाढण्याची शक्यता असून कांदा ग्राहकांना रडविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
>लासलगावला विक्रमी ५१ रुपये भाव
नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी पाटोदा येथील शेतकरी लिलाबाई अशोक बोराडे यांच्या ९ क्विंटल ७० किलो उन्हाळ कांद्याला या वर्षीचा विक्रमी ५,१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
सोमवारी बाजार समितीत १,०५० वाहनांतून कांदा विक्रीस आला होता. आवक कमी असल्याने व मागणी जास्त असल्याने व्यापाऱ्यांनी चढ्या बोली लावल्या. उन्हाळ कांद्याला १,३०० ते ५,१०० व सर्वसाधारण ४,००० रुपये भाव मिळाला. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी भावात तेजी होती. जिल्ह्यात सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आवक कमी झाली आहे. त्यातच आंध्र प्रदेशात तीन दिवसांपासून मोठा पाऊस सुरू आहे. त्यामुळे कुर्नुलसह तेथील इतर बाजारपेठेत आवक कमी झाली आहे. परिणामी महाराष्ट्रात भावात वाढ झाली आहे. बुधवारी लासलगाव येथील बाजारपेठेत सर्वाधिक ३,६४८, तर विंचूर येथे ४,००० रुपये क्विंटल भाव जाहीर झाला होता. बुधवारी ४६१ वाहनातून कांदा आवक झाली होती.
>बाजार समितीमधील कांद्याचे दर
महिना दर (प्रतिकिलो)
मार्च ०७ ते ०९
एप्रिल ०७ ते ०९
जून १२ ते १६
महिना दर (प्रतिकिलो)
जुलै ११ ते १४
आॅगस्ट १७ ते २२
१९ सप्टेंबर ३७ ते ४५
>राज्यातील बाजार समितीमधील गुरुवारचे दर
बाजार समिती दर
मुंबई ३७ ते ४५
नागपूर १९ ते २९
पुणे २५ ते ३८
बाजार समिती दर
नाशिक ३२ ते ४७
लासलगाव १५ ते ४६
सातारा १० ते ३८
>पुणे व नाशिकमधून कांद्याची आवक होत आहे. कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्येही कांदा चाळीशीच्या पुढे गेला आहे. आवक कमी असल्यामुळे मुंबईतही कांद्याचे दर वाढत आहेत.
- दिगंबर राऊत,
कांदा व्यापारी, एपीएमसी
बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी होत असून, तेथे रोज बाजारभाव वाढत आहेत. यामुळे किरकोळ मार्केटमधील दरही वाढत आहेत. आवक सुरळीत होईपर्यंत तेजी कायम राहील.
- बाबू घाग, किरकोळ भाजीविक्रेते