पनवेलमध्ये घरगुती बाप्पाच्या ऑनलाइन बुकिंगला सुरुवात; कोरोनामुळे मागणीही घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:16 AM2020-07-22T00:16:53+5:302020-07-22T00:17:06+5:30
स्टॉलला परवानगी नसल्याने विक्रेते नाराज
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : कोरोनामुळे या वर्षी गणेशोत्सवावर विरजण पडले आहे. बाप्पांचे अगमन जवळ आले, तरी बाजारात कोणतीही लगबग दिसत नाही. गणपती स्टॉलचाही पत्ता नाही. त्यामुळे अनेक कारागिरांनी बाप्पाच्या मूर्तीची विक्री आॅनलाइनद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल परिसरात या आॅनलाइन नोंदणीला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहेत. सध्या बाप्पाची वेगवेगळी रूपे व्हॉट्सअॅप, पीडीएफ फाइलद्वारे ग्राहकांना पाठवून आॅनलाइन बुकिंग केली जात आहे.
गणेशोत्सवाच्या तीन ते चार महिने अगोदर मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. परंतु यंदा करोनामुळे चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. याचा फटका कारागिरांनाही बसला आहे. कच्च्या मालापासून ते मूर्ती विक्री करेपर्यंत बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. पनवेल परिसरात कुंभारवाडा येथे तीन, तर भिंगारी येथे सात मूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत. या कार्यशाळेत बारा महिने काम चालते.
लॉकडाऊन आणि शासनाने मूर्तीच्या उंचीवर घातलेल्या मर्यादा, यामुळे पनवेल परिसरातील मोठे गणेशोत्सव मंडळांनी या वर्षी उत्सवच रद्द केला आहे. त्यामुळे कारागिरांनी अर्ध्या फुटापासून दोन ते अडीच फुटांपर्यंतच्या घरगुती मूर्ती बनविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आपोआपच मोठ्या मूर्तींची मागणी कमी झाली आहे, तसेच बाजारात स्टॉलसाठी महापालिकेने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मूर्तिकारांनी व्हॉट्सअॅप, पीडीएफच्या माध्यमातून आॅनलाइन बुकिंग सुरू केली आहे.
दरवर्षी घरीही तीन ते चार फुटापर्यंतच्या मूर्तीची स्थापना केली जाते. मात्र, या वर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या आर्थिक टंचाईचा विचार करून, बहुतांशी भाविकांनी लहान मूर्तींची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याचे हितेश पंड्या या भाविकांनी सांगितले.
गुंतवलेले भांडवल निघाले, तरी समाधान
पनवेल परिसरातील भिंगारी आणि कुंभारवाडा येथील १० कारखाने हे पारंपरिक वारसाद्वारे चालवले जातात. या कारखान्यात वर्षभर कामे चालतात. त्यांचा उदरनिर्वाह हा मूर्ती बनवण्यावर अवलंबून आहे. परंतु यंदा कोरोनामुळे मोठी आर्थिक हानी झाली आहे. बनवलेल्या मूर्तीही विकल्या जातील की नाही, याची चिंता सतावत आहे. कोरोनामुळे गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणारे रबरी साचे, प्लॅस्टर आॅफ पॅरिस त्यासाठी लागणारे वेगवेगळे रंग यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्या प्रमाणात गणेशमूर्तींना किंमत मिळणे अवश्यक आहे. मूर्ती बनवण्यासाठी गुंतवलेले भांडवल निघाले, तरी भरपूर आहे, अशी भावना केतन मांगरुळकर या कारागिराने व्यक्त केली आहे.