कळंबोली : शाळांचे मूल्यमापन व्हावे, त्यांचा दर्जा समजावा याकरिता आयएसओच्या धर्तीवर शाळा सिद्धी उपक्र म राबविण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील सर्व शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. त्याकरिता तालुका पातळीवर स्वतंत्र लिंक तयार करण्यात आली आहे. जवळपास ८० टक्के शाळांची माहिती तालुका गटशिक्षण अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच शाळांना आपल्या श्रेणीची माहिती उपलब्ध होणार आहे. तालुक्यात सरकारने राबवलेले बहुतांशी कार्यक्रम यशस्वी झाले आहेत. सरल डाटापासून, पायाभूत चाचणी, शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम, ज्ञानरचनावाद या गोष्टी अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. ई-लर्निंगचे धडे घेताना झेडपी शाळा डिजिटल होऊ लागल्या आहेत. ‘एक दिवस शाळेसाठी’ या अभियानामुळे सर्व अधिकारी जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन आले. तेथील परिस्थिती सुधारविण्यासाठी त्यांच्याकडून मदत झाली. यामध्ये एका नव्या उपक्र माची पुन्हा भर पडली आहे. या अंतर्गत गुणवत्तापूर्ण शाळेसह त्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे मूल्यमापन करता येणार आहे. त्यासाठी शाळांना आॅनलाइनच्या माध्यमातून नोंदणी केली आहे. यासंदर्भात राज्य, जिल्हा आणि तालुकापातळीवर प्रशिक्षण घेण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील ५३६ शाळांनी शाळा सिद्धी उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार आॅनलाइन माहितीही भरली आहे. तालुक्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या निर्धारकाच्या माध्यमातून मूल्यमापन करण्याचे कामसुद्धा सुरू करण्यात आलेले आहे.आयएसओच्या धर्तीवर हा उपक्र म शाळांत राबवला जात आहे. त्यामुळे यापुढे हे आयएसओकरिता नामांकन भरण्याची आवश्यकता भासणार नाही. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या भौतिक सुविधा, गुणवत्तेच्या सुविधा, सोयी, उपस्थिती टिकावी यासाठी राबविण्यात येणारे उपक्र म, डिजिटल शाळा, ई-लर्निंग उपक्र म, हसत-खेळत शिक्षण यांचा समावेश आहे. त्यामुळे यापूर्वीचे उपक्रम अर्थातच या नवीन राष्ट्रीय पातळीवरील प्रणालीत समाविष्ट झाले आहेत. शाळा सिद्धी या प्रकल्पात पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील २७९१ शाळा सहभागी झाल्या आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व शाळांच्या मूल्यमापनासाठी समिती नेमण्यात आली आहे. १००० गुणांचे हे मूल्यमापन असल्याने ती माहिती शाळेनेच आॅनलाइन भरली आहे.शाळा गुणवत्ता एका क्लिकवर शाळेत प्रवेश घ्यावयाचा असल्यास शाळांची गुणवत्ता कशी आहे हे या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. शाळांचा दर्जा ठरविण्यासाठी भारतात सर्व निकष एकच ठेवण्यात आले आहे. शाळांबाबत चौकशी करताना संपूर्ण माहिती नेटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर ही सर्व माहिती दिली जाणार असून शाळांना अ,ब,क,ड अशा स्वरूपाचा दर्जा दिला जाणार आहे.शाळा सिद्धी हा उपक्र म आयएसओच्या धर्तीवर एक मानक आहे. यानुसार शाळेचे प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. या माध्यमातून शाळेचा विकास होणार आहे. त्यानुसार तालुक्यातील सर्व शाळांनी माहिती दिली आहे. आम्ही याकरिता समांतर लिंक तयार केली आहे. त्यामाध्यमातून ४८० शाळांची माहिती जमा केली आहे. लवकरच उर्वरित शाळांचा डाटा उपलब्ध होईल. निर्धारकाच्या मदतीने तयार केलेल्या या समांतर यंत्रणेमुळे तालुक्यातील शाळांचा दर्जा त्वरित समजणार आहे.- नवनाथ साबळे, गटशिक्षण अधिकारी, पनवेल तालुका
शाळांचे आॅनलाइन मूल्यांकन होणार
By admin | Published: March 30, 2017 6:57 AM