सीबीएसई शाळांत ऑनलाइन परीक्षा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 12:14 AM2020-06-24T00:14:46+5:302020-06-24T00:14:51+5:30
पालकांच्या अडचणींचा विचार करून प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी पालक करीत आहेत.
नवी मुंबई : सीबीएसई बोर्डाच्या शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. शाळा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाला पालकांनी विरोध केला आहे. पालकांच्या अडचणींचा विचार करून प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी पालक करीत आहेत.
लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्राला फटका बसला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सीबीएसई बोर्डाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षा लॉकडाऊनच्या आधीच पूर्ण झाल्या होत्या. मार्च महिन्यात विद्यार्थ्यांचे आॅनलाइन निकाल घोषित करून एप्रिल महिन्यात पुढील शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. मे महिन्यात सुट्ट्या देऊन जून महिन्यात पुन्हा आॅनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आॅनलाइन पद्धतीने शिकविलेला नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कितपत समजला हे तपासण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांची उजळणी घेण्याच्या हेतूने सध्या आॅनलाइन चाचणी परीक्षा घेण्यात येत आहेत. काही शाळांमध्ये २० गुणांच्या आॅनलाइन सराव परीक्षेला सुरुवात झाली आहेत, तर काही शाळांच्या परीक्षा पुढच्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यावर शहरातील पुस्तके विक्रीची दुकाने उघडली आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेक पालकांना वेतन न मिळाल्याने त्यांनी अद्याप पुस्तके घेतलेली नाहीत.
>लॉकडाऊननंतर सर्व क्षेत्रांतील नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. शाळा आॅनलाइन सुरू झाल्या असल्या, तरी अनेक पालकांनी पुस्तके घेतलेली नाहीत. त्यामुळे सर्व परीक्षेसाठी मुलांचा अभ्यास होणार कसा, हा एक प्रश्न आहे. अनेक पालक नोकरवर्ग असून, तीन महिन्यांनंतर त्यांची कामे सुरू झाली आहेत, त्यामुळे लहान मुलांच्या परीक्षेसाठी त्यांना सुट्टी घेणे अशक्य आहे. शाळा प्रशासनाने या सर्व अडचणींचा विचार करून शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्यावर परीक्षा घ्याव्यात.
- रेश्मा घोलप, पालक, नवी मुंबई