नवी मुंबई : शहरात पुन्हा एकदा ऑनलाईन जुगार अड्डे वाढू लागले आहेत. अशा दोन ठिकाणांवर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. रहदारीच्या ठिकाणी गाळ्यांमध्ये चालणाऱ्या या जुगार अड्ड्यांकडे स्थानिक पोलिसांकडून दुर्लक्ष होत होते. मागील काही वर्षापूर्वी नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन जुगार अड्डे चालवले जात होते. थेट बड्या अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण मूकसंमती मिळवून स्थानिक पातळीवर कारवाईत सूट मिळवली जात होती. त्यामुळे जागोजागी लॉटरी सेंटरच्या नावाखाली किंवा इतर नावाने हे जुगार चालवले जात होते. परंतु पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार घेतल्यानंतर हे जुगार अड्डे बंद झाले होते.
परंतु नुकतेच पुन्हा एकदा त्यांना मोकळे रान मिळू लागले आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी थेट कॅसिनो सुरु करून ऑनलाईन जुगार अड्डे चालवले जात आहेत. अशाच दोन ठिकाणांची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष एक चे वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील, सहायक निरीक्षक निलेश बनकर, उपनिरीक्षक नरेंद्र पाटील आदींच्या पथकाने घणसोली डीमार्ट परिसरात छापा टाकला. त्यामध्ये सेक्टर ७ येथील रिद्धी सिद्धी सोसायटीमधील व्यावसायिक गाळ्यात चालणारा जुगार उघड झाला. चिंचपाडा येथे राहणारा सचिन वाघे याच्याकडून हा अड्डा चालवला जात होता.
याप्रकरणी वाघे याच्यासह संतोष खरवार, विशाल आवटे, नवनाथ गोडेकर, अविनाश अडसूळ, सुनील सातपुते, पंडित चव्हाण, कलामुद्दीन खान, सुजिद कदम, दिनेश शिंदे व बाबू आरडे यांच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सानपाडा रेल्वेस्थानकासमोर एस. के. इंटरप्रायजेस नावाने ऑनलाईन जुगार चालवला जात होता. त्याठिकाणी देखील गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी जुगार चालक अमित मिश्रा, किरण भानुशाली, निलेश निकम, वैभव खातू, सत्यवान पाटील, विजय बोरकर व पवनकुमार मंडल यांच्यावर सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही ठिकाणी अनेक दिवसांपासून उघडपणे जुगार अड्डा चालत असतानाही स्थानिक पोलिसांकडून कारवाईत हात आखडता घेतला जात होता. अखेर त्याची तक्रार गुन्हे शाखा पोलिसांना मिळताच त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. घणसोली येथील कारवाईत सव्वा लाखाचा मुद्देमाल तर सानपाडा येथील कारवाईत १ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील इतरही ठिकाणचे ऑनलाईन जुगार गुन्हे शाखा पोलिसांच्या रडारवर आले आहेत.