पनवेल महापालिका देणार बांधकामाची आॅनलाइन परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 06:18 AM2017-08-12T06:18:21+5:302017-08-12T06:18:21+5:30
नव्याने बांधकाम सुरू करण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी अनेकांना पालिकेच्या कार्यालयात खेटे मारावे लागतात .
- वैभव गायकर
पनवेल : नव्याने बांधकाम सुरू करण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी अनेकांना पालिकेच्या कार्यालयात खेटे मारावे लागतात . यामुळे मोठ्या प्रमाणात वेळेचा तर अपव्यय होतोच शिवाय विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. अर्जदारासह अधिकारी वर्गाला देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र महाराष्ट्र शासनाच्या महावास्तू या प्रकल्पामुळे या सर्वापासून बांधकाम परवानगीसाठी अर्ज करणारे अर्जदारासह अधिकारी वर्गाची मुक्तता होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३ आॅगस्ट रोजी महावास्तू पोर्टलचे उद्घाटन यावेळी करण्यात आले असून बांधकाम परवानगी प्रक्रि येत यामुळे पारदर्शकता येणार आहे. याकरिता राबविल्या जाणाºया पायलट प्रकल्पासाठी राज्यातील तीन शहरांचा समावेश करण्यात आला असून पनवेल, मालेगाव व भिवंडी या तीन शहरांचा यामध्ये समावेश आहे.
नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेचा देखील या तीन शहरात समावेश करण्यात आला असून पनवेलमध्ये नव्याने बांधकाम करणाºया बांधकाम व्यावसायिकांना आॅॅनलाइन बांधकाम परवानगी मिळणार आहे. या प्रक्रियेत कोणाचाच हस्तक्षेप नसल्याने बांधकाम परवानग्यांबाबत पारदर्शकता येण्याकरिता हा प्रकल्प राज्यातील सर्व नगरपालिकेत राबविला जाणार आहे. या आॅनलाइन प्रक्रियेकरिता महाराष्ट्र शासनाच्या महावास्तू या पोर्टलवर बांधकामाच्या परवानगीकरिता लागणारी सर्व कागदपत्रे, बांधकामाचा आराखडा तसेच त्याकरिता लागणारी फी भरल्यानंतर नेमलेला पालिका अधिकारी या सर्व कागदपत्रांची छाननी करेल. ही सर्व प्रक्रिया संगणकीकृत असल्याने अंतिमत: या सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर आयुक्तांकडे अंतिम टप्प्यात ही परवानगी गेल्यानंतर त्यांची सही झाल्यानंतर आॅनलाइनच हा रिपोर्ट अर्जदाराला जनरेट होवून त्याला बांधकाम परवानगी मिळेल. ४५ दिवसांच्या आत ही बांधकाम परवानगी अर्जदाराला प्राप्त होणार आहे.
पनवेल महानगरपालिकेचे अभियंता संजय कटेकर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सद्यस्थितीला पनवेल महानगर पालिकेतील जुन्या नगरपालिका क्षेत्रात ही आॅनलाइन बांधकाम परवानगी घेता येणार आहे.
पालिकेत समाविष्ट २९ गावे व सिडको नोडचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. भविष्यात ही योजना याठिकाणी देखील विस्तारली जाईल. यासंदर्भात अधिकारी वर्गाला प्रशिक्षण दिल्यानंतर पनवेल महानगर पालिकेच्या वतीने आॅनलाइन बांधकामांना परवानगी देण्यास सुरुवात होणार आहे.
पनवेल महानगर पालिकेत जुन्या नगरपरिषदेसह २९ गावे व सहा सिडको नोडचा समावेश आहे. मात्र अद्याप आॅनलाइन बांधकाम परवानगी केवळ पालिकेच्या जुन्या नगरपालिका हद्दीतच सुरू होणार आहे. भविष्यात पालिकेच्या इतर भागात देखील ही प्रक्रिया सुरू होणार आहे.