- वैभव गायकरपनवेल : सध्याच्या आधुनिक युगात प्रत्येक गोष्ट आॅनलाइन झाली आहे. आपला व्यवसाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सध्याच्या घडीला विविध आॅनलाइन पोर्टलची मदत घेतली जाते. यासाठी वाटेल ती रक्कम मोजण्याची तयारी व्यावसायिकाची असते. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत शहर उपजीविका केंद्राची वेबसाइट व मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले आहे. याअंतर्गत पनवेलमधील लहान-मोठ्या व्यावसायिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.ही योजना केवळ कागदोपत्री न राहता, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी त्याला आधुनिक स्वरूप प्राप्त करून दिले आहे. त्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील उद्योजक, नागरिक, सामाजिक संस्था, बचतगट, हाउसिंग सोसायटी, गृहिणी तसेच विद्यार्थ्यांना हे अॅप्लिकेशन डाउनलोड करता येणार आहे. या अॅप्लिकेशनद्वारे आपल्या व्यवसायाची आॅनलाइन नोंदणी करून वस्तू व सेवेची मोफत प्रसिद्धी तसेच आर्थिक उन्नती करता येणार आहे. बचतगटाद्वारे भरविण्यात आलेला मेळावा, शाळा-कॉलेज फेस्ट२ आदीची प्रसिद्धी या ठिकाणी करता येणार आहे. विशेष म्हणजे, प्लम्बरपासून लहान मोठ्या व्यावसायिकांना या सुविधेचा मोठा लाभ होणार आहे.महिनाभरात ४६९ जणांनी हे अॅप्लिकेशन डाउनलोड केले आहे. यापैकी अद्याप ११८ जणांनी आपल्या व्यवसायाची नोंदणीसुद्धा केली आहे. दरम्यान, अधिकाधिक लोकांनी हे अॅप्लिकेशन डाउनलोड करून आपल्या व्यवसायाची नोंदणी करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.पनवेल महानगरपालिकेचा विस्तार मोठा आहे. पनवेल शहर हे नव्याने विकसित होत आहे. त्या दृष्टीने नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, यापासून विखुरलेल्या लोकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेने पाऊल उचलेले आहे. नागरिकांनी याअॅप्लिकेशनमध्ये नोंदणी करून आपल्या व्यवसायाच्या सीमा वाढवाव्यात.- जमीर लेंगरेकर,उपायुक्त, पनवेल महानगरपालिका
व्यावसायिकांना ऑनलाइन व्यासपीठ, पनवेल महानगरपालिकेकडून सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 2:58 AM