'बचत गटांसाठी आॅनलाइन पोर्टल सुरू करणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 05:38 AM2018-08-28T05:38:44+5:302018-08-28T05:39:48+5:30
पंकजा मुंडे यांची घोषणा : बचतगटांच्या गाळ्यांचे उद्घाटन
पनवेल : बचत गटांच्या उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आॅनलाइन पोर्टल सुरू करणार असल्याची घोषणा ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. खारघर शहरातील ग्रामविकास भवनातील ३0 गाळ्यांचे लोकार्पण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान व फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या महाअस्मिता नावीन्यपूर्ण उपजीविका गतिवर्धन कार्यक्रम(मिलाप) चे देखील उद्घाटन करण्यात आले. राज्यभरातील विविध बचत कार्य केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. मिलाप या पुस्तकाचे देखील प्रकाशन यावेळी करण्यात आले. पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला असा नारा दिला होता त्यामध्ये त्यांची दूरदृष्टी होती. ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामीण भागातच रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्यास देश नक्कीच सुदृढ होईल. राज्यभरात पुढील वर्षापर्यंत पाच लाख बचत गट स्थापन करण्याचे आमचे ध्येय असून पाच वर्षापर्यंत सुमारे दहा लाख बचत गट स्थापन केले जातील असाही विश्वास व्यक्त केला. खारघर शहरातील ग्रामविकास भवनामधील उभारण्यात आलेल्या गाळ्यामध्ये बचत गटांना रोजगाराची संधी निर्माण होईल. विशेष म्हणजे बचत गटांच्या वस्तूंना आॅनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे देखील आमचे प्रयत्न सुरु आहेत. याकरिता आॅनलाइन पोर्टल उभारण्याचे काम देखील सुरू असल्याचे स्पष्ट केले.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याच्या बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ग्रामविकास भवन माझ्या मतदारसंघात आहे हे आमचे भाग्य असल्याचे स्पष्ट केले. ग्रामविकास मंत्रालयामार्फत खूप चांगल्या पद्धतीने काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्याची स्तुती करत मी २0 वर्षे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचा नगरसेवक असताना वेळोवेळी बचत गटांना साहाय्य केले असल्याची आठवण त्यांनी करून दिली. यावेळी आमदार निरंजन डावखरे, महापौर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, दर्शना भोईर, अभिमन्यू पाटील, नीलेश बाविस्कर, प्रवीण पाटील, लीना गरड, अरुणकुमार भगत, नरेश ठाकूर, वनिता पाटील, नेत्रा पाटील आदी उपस्थित होते.