नवी मुंबई : सिडकोने तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली व द्रोणागिरी नोडमधील ११०० शिल्लक घरांसाठी आॅनलाइन नोंदणी सुरू केली आहे. यासाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट यांच्याकरिता बांधण्यात आलेल्या १४,८३८ घरांसाठी सिडकोने आॅगस्टमध्ये सोडत काढली होती. या योजनेमधील ११०० घरे शिल्लक असून, त्यासाठी १ जानेवारीपासून आॅनलाइन नोंदणी सुरू केली आहे. यामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या सदनिका केवळ प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र अर्जदारासाठी आहेत. अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका योजनेतील अटीनुसार पात्र ठरणाऱ्या अर्जदारांना वितरित करण्यात येणार आहेत.घरांसाठीचे अर्ज व सर्व माहिती सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी मोबाइल अॅपही सुरू केले असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. ३० जानेवारीपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार असून, ३१ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. १४ फेब्रुवारीला या योजनेकरिता सोडत काढण्यात येणार आहे.
सिडकोच्या शिल्लक घरांसाठी आॅनलाइन नोंदणी; ३१ जानेवारीपर्यंत मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 1:35 AM