सिडको गृहप्रकल्पातील घरांच्या ऑनलाइन नोंदणीची गती मंदावली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:45 PM2019-10-17T23:45:52+5:302019-10-17T23:46:22+5:30
ग्राहकांची पाठ : महिनाभरात केवळ एक लाख अर्ज
नवी मुंबई : विधानसभा निवडणूक आणि दसरा-दिवाळीचा सण यामुळे सिडकोच्या घरांची ऑनलाइन नोंदणीची गती मंदावल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून मागील महिनाभरात जेमतेम एक लाख ग्राहकांनीच ऑनलाइन नोंदणी केल्याचे दिसून आले आहे.
सिडकोने आपल्या जुन्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पातील शिल्लक राहिलेली ८१४ घरे आणि नव्याने उभारण्यात येणाऱ्या महागृहनिर्माण योजनेतील ९,२४९ घरांच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीला ११ सप्टेंबरपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. या गृहनिर्माण योजनांतील सर्व घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट यांकरिता उपलब्ध आहेत. यापैकी स्वप्नपूर्ती प्रकल्पातील शिल्लक ८१४ घरांच्या नोंदणीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याकरिता ५ आॅक्टोबरची अंतिम मुदत देण्यात आली होती. तर नव्याने उभारण्यात येणाºया ९,२२४ घरांसाठी अर्ज भरण्याची मुदत १८ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता ही मुदत ५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे; परंतु निवडणुकीची धामधूम, दसरा आणि आता येऊ घातलेला दिवाळाचा सण आदीमुळे मागील १५ दिवसांत आॅनलाइन नोंदणीच्या प्रक्रियेला धिमा प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम म्हणून आतापर्यंत अर्जाचा एक लाखांचा आकडाही गाठता आलेला नाही.
सिडकोच्या संबंधित विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार १४ आॅक्टोबर २०१९ च्या संध्याकाळपर्यंत ९१,३४४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यावरून सिडकोचे घर खरेदी करण्यासाठी आता ग्राहकही फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. कारण गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या १५ हजार घरांच्या योजनेसाठी जवळपास दोन लाख अर्ज प्राप्त झाले होते; परंतु त्यातील काही अटी ग्राहकांना जाचक ठरत असल्याने या वेळी घरांच्या नोंदणीसाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, घरांच्या नोंदणीसाठीची मुदत ५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा दावा सिडकोच्या संबंधित विभागाकडून करण्यात आला आहे. या योजनांची सोडत २६ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे.