वैभव गायकर पनवेल : कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता, शिक्षण संस्थांमार्फत आॅनलाइन शिक्षणाचा आधार घेतला जात आहे. झूम अॅप्लिकेशनद्वारे विद्यार्थ्यांना घरबसल्या आॅनलाइन शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मात्र, हा अट्टहास केवळ फी वसूल करण्यासाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांमार्फत फी भरली गेली नाही, अशा विद्यार्थ्यांचे आॅनलाइन क्लासेसमधील कनेक्शन बंद केले जात असल्याचा आरोप नगरसेवक हरेश केणी यांनी केला आहे.या संदर्भात नगरसेवक हरेश केणी यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याकडे या संदर्भात लेखी निवेदन दिले आहे. लॉकडाऊन काळात नोकरदार वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असताना, मोठ्या प्रमाणात आर्थिककोंडीत सापडलेल्या पालकांना दिलासा देण्याची गरज आहे. सध्याच्या घडीला अनेक शाळांनी फी वसुलीचा तगादा पालकांकडे लावला आहे. मात्र, जे पालक काही कारणास्तव आपल्या पाल्यांची फी भरू शकत नाहीत,े अशा विद्यार्थ्यांना आॅनलाइन वर्गातून वगळले जात असल्याचा गंभीर आरोप केणी यांनी केला आहे.पनवेल महानगरपालिकेतील काही शाळांनी हा प्रकार सुरू केला आहे. या प्रकारामुळे चिमुकल्यांचे खच्चीकरण होण्याची शक्यता आहे. शिक्षण संस्थांमार्फत अशाप्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवेल जात असेल, तर हा गुन्हा आहे. संबंधित शाळांवर कारवाईसाठी शिक्षणमंत्र्यांनाही नगरसेवक हरेश केणी यांनी पत्र लिहले आहे.।आॅनलाइन शिक्षणपद्धती बंद करण्याची मागणीसध्याच्या घडीला आॅनलाइन शिक्षणपद्धती अनेक शिक्षण संस्थांनी अंगीकारली आहे. एमआयएमचे स्टुडंट विंगचे कोंकण निरीक्षक हाजी शहनवाज खान यांनी या शिक्षणपद्धतीला विरोध दर्शविला आहे. या नवीन धोरणामुळे समाजामध्ये भेदभाव निर्माण होत चालला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पालक एनरॉईड फोन, टॅब खरेदी करू शकत नाहीत, त्यांचे काय? बीडमध्ये हलाकीच्या परिस्थितीमुळे आॅनलाइन शिक्षणापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून या आॅनलाइन शिक्षणाला एमआयएमचे स्टुडंट विंगचे हाजी शहनवाज खान यांनी विरोध दर्शवत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
फी न भरल्याने ऑनलाइन शाळा बंद, संबंधितांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 12:01 AM