नवी मुंबई : व्हॉट्सॲपवर मुलींचे फोटो पाठवून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दांपत्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन मुलींची सुटका करण्यात आली असून त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी आहे. सोमवारी रात्री वाशी परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ग्राहकांना मोबाईलवर अल्पवयीन मुलींचे फोटो पाठवून ऑनलाईन सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सोमवारी रात्री वाशी रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचला होता.
तर बनावट ग्राहकामार्फत दलालांना संपर्क साधला होता. त्यानुसार मुलींना घेऊन दलाल दांपत्य त्याठिकाणी आले असता पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. यावेळी दाम्पत्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शिताफीने त्यांना अटक केली. त्यांनी ग्राहकांना पुरवण्यासाठी आणलेल्या तीन मुलींची सुटका करण्यात आली. त्यामध्ये एक मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्यानुसार या दलाल दांपत्यावर बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून या दलाला दांपत्याने पीडित मुलींचा देहविक्रीसाठी वापर केला आहे. गरीब कुटुंबातील मुलींच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते.