पनवेल पालिकेच्या ताफ्यात केवळ ११ रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 12:42 AM2021-04-04T00:42:04+5:302021-04-04T00:42:13+5:30
खाजगी ॲम्ब्युलन्स ताब्यात घेऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज
पनवेल : पनवेल महानगरपालिका परिसरात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या घडीला पालिका क्षेत्रात एकूण २,५५० कोविडबाधित रुग्ण आहेत. दिवसेंदिवस या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोणत्याही क्षणी रुग्णसंख्येचा भडका उडण्याची शक्यता आहे. याकरिता पालिकेने आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. सध्याच्या घडीला पालिकेकडे केवळ ११ रुग्णवाहिका आहेत. याव्यतिरिक्त शेकडो खाजगी रुग्णवाहिका पालिका क्षेत्रात कार्यरत आहेत.
पालिकेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात २, इंडिया बुल्स कोविड सेंटर २ तसेच नुकत्याच नव्याने सुरू झालेल्या कळंबोली कोविड केअर सेंटरमध्ये १ रुग्णवाहिका आहे. या रुग्णवाहिकांचा वापर बहुतांशी वेळेला कोविडची बाधा झालेल्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी होत असतो. याव्यतिरिक्त कोविडने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांनादेखील या रुग्णवाहिकांद्वारेच अंत्यविधीसाठी पोहोचविले जाते. दिवसरात्र २४ तास या पालिकेच्या मालकीच्या रुग्णवाहिका कार्यरत असतात. इंडिया बुल्स क्वारंटाईन सेंटर हे पनवेल शहरापासून लांब असल्याने या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था असलेली एक रुग्णवाहिका आहे. जेणेकरून रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता भासली तर या रुग्णवाहिकेचा उपयोग होईल. याव्यतिरिक्त सध्याच्या घडीला शासकीय केंद्रावर लसीकरण सुरू आहे. पालिकेच्या माध्यमातून खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल, नवीन पनवेल आदी ठिकाणच्या नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या सहा रुग्णवाहिका आहेत. लसीकरणावेळी अत्यावश्यक परिस्थिती ओढवल्यास या रुग्णवाहिकांचा वापर करता येणार आहे. सध्याच्या घडीला कोविड रुग्ण वाढले असले तरी बहुतांशी रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रातील परिस्थिती अद्यापपर्यंत तरी नियंत्रणात आहे. उपजिल्हा रुग्णालय व इंडिया बुल्स कोविड सेंटरमध्ये केवळ १४६ रुग्ण आहेत.
द्यावी लागते नियमबाह्य रक्कम
पालिकेच्या रुग्णवाहिकांव्यतिरिक्त पालिका क्षेत्रात शेकडो रुग्णवाहिका आहेत. यामध्ये रुग्णालयांच्या मालकीच्यादेखील रुग्णवाहिका आहेत. रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्या तरी कोविड काळात खाजगी रुग्णवाहिका चालक आपल्या पद्धतीने भाड्याची आकारणी करीत असतात. विशेषतः कोविड काळात रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्यास जवळचे नातेवाईकदेखील पुढे येत नसल्याने नाइलाजास्तव अनेक जण वाट्टेल ती नियमबाह्य रक्कम रुग्णवाहिका चालकांना देत आहेत. पालिकेच्या अखत्यारीत या रुग्णवाहिका येत नाहीत. या रुग्णवाहिकांवर थेट प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नियंत्रण असल्याने याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित रुग्णवाहिका चालकांना योग्य त्या सूचना देणे गरजेचे आहे.
पालिकेच्या माध्यमातून खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल, नवीन पनवेल आदी ठिकाणच्या नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या सहा रुग्णवाहिका आहेत.