तळोजातील १८ कारखानेच बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 03:18 AM2018-06-02T03:18:40+5:302018-06-02T03:18:40+5:30
हरित लवादाच्या माध्यमातून तळोजा एमआयडीसीमधील ३५0 रासायनिक कारखाने बंद करण्याचा कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही
पनवेल : हरित लवादाच्या माध्यमातून तळोजा एमआयडीसीमधील ३५0 रासायनिक कारखाने बंद करण्याचा कोणताच निर्णय घेतला गेलेला नाही. केवळ १८ कारखान्यांना बंद करण्याचे आदेश दिलेले असून उर्वरित कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस दिली असल्याचे सांगत चुकीच्या माहितीमुळे तळोजा एमआयडीसीमधील कारखानदारांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे दि. १ रोजी टीएमएने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
तळोजा एमआयडीसीमध्ये होत असलेल्या प्रदूषणासंदर्भात नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली आहे. या याचिकेवर दि. ३0 रोजी सुनावणी वेळी हरित लवादाने तळोजा एमआयडीसीमधील ३५0 रासायनिक कारखाने बंद करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांना दिली. मात्र हे वृत्त खोटे असून या वृत्तामुळे तळोजा एमआयडीसीमधील कारखानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशाप्रकारे कोणताच निर्णय हरित लवादाने घेतलेला नसून केवळ १८ कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला असून उर्वरित कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे तळोजा मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या सचिव जयश्री काटकर यांनी स्पष्ट केले. तसेच ५ कोटी दंड भरण्याचे आदेश हरित लवादाने दिलेले नसून संबंधित रक्कम डिपॉजिट करण्यास सांगितले असल्याचे टीएमएचे श्यामसुंदर कारकून यांनी स्पष्ट केले. या सुनावणीदरम्यान मी स्वत: दिल्लीला उपस्थित असल्याने
सध्या प्रसार माध्यमामध्ये सुरू
असलेले वृत्त खोटे असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी याचिकाकर्ते अरविंद म्हात्रे ही मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शनिवार, रविवार सुट्या असल्याने संबंधित आदेशाची प्रत प्राप्त झालेली नाही. सोमवारी संबंधित आदेश लेखी स्वरूपात हातात पडल्यावर या प्रकरणी मी दिलेली माहिती सर्वांसमोर येईल.