निवृत्त मुख्याधिकाऱ्यांच्या मुलीच्या लग्नात फक्त १८ माणसे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:56 AM2021-05-07T00:56:57+5:302021-05-07T00:57:28+5:30
कर्जतमध्ये पार पडलेल्या विवाहातून आदर्श
विजय मांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : कर्जत नगर परिषदेत दोन टर्म मुख्याधिकारीपदी असलेले सेवानिवृत्त दादाराव अटकोरे यांनी आपल्या मुलीचा विवाह सोहळा अवघ्या अकरा जणांच्या उपस्थितीत संपन्न करून कोरोना महामारीच्या काळात समाजापुढे एक आदर्श ठेवला. आपल्या समारंभामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये हाच त्यामागचा त्यांचा हेतू होता.
शासनाने कितीही निर्बंध आणले तरी त्यांचे तंतोतंत पालन होतेच असे नाही. पहिल्या लाटेमध्ये कोरोनाच्या भीतीने हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांमध्ये विवाह सोहळे उरकले गेले. त्यानंतर मध्यंतरी विवाह सोहळ्यासाठी ५० जणांची उपस्थिती असावी, असा आदेश होता. मात्र, तो आदेश बासनात गुंडाळून अनेक ठिकाणी विवाह सोहळ्याला दहापट गर्दी होत होती. हे झाले विवाह सोहळ्याचे. त्यापूर्वी होणाऱ्या साखरपुडा किंवा हळदी समारंभालाही ‘लक्षणीय’ गर्दी होत होती आणि यामुळेच अनेक गावांत कोरोनाने थैमान घातले आहे.
कर्जत नगर परिषदेत दोन वेळा मुख्याधिकारी म्हणून काम केलेले सेवानिवृत्त झालेले दादाराव अटकोरे हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील मालेगावचे. आपली कन्या डॉ. ऋतुजा हिचा विवाह थाटामाटात करण्याचा त्यांचा विचार होता. कारण त्यांच्या कुटुंबातील हे पहिलेच लग्न होते. मात्र, गेल्या वर्ष- सव्वावर्षापासून कोरोना महामारीचे संकट आले आणि सर्वच समारंभांवर शासनाने निर्बंध घातले. त्यामुळे इच्छा असूनही मनासारखे शुभकार्य करता येत नव्हते. त्यात अटकोरे शासकीय नोकरी केलेले असल्याने त्यांना काहीच अडचण नव्हती.
डॉक्टर असलेल्या ऋतुजाचे लग्न औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडमधील गणपतराव सालवे यांच्या पायलट असलेल्या आकाशकुमारशी ठरले होते. त्यांनी शासकीय नियमांचे पालन करूनच लग्न सोहळा करायचे ठरविले व त्यांना सालवे कुटुंबीयांनी पूर्ण सहकार्य करण्याचे ठरविले.
लग्नाचा दिवस उजाडला. राज कॉटेजमध्ये एका छोट्या सभागृहात लग्न सोहळा सुरू झाला. विवाह सोहळ्यासाठी २५ जणांच्या उपस्थितीची परवानगी होती. तरीही यावेळी वधू- वर यांच्यासह दोन्ही कुटुंबातील मिळून केवळ अकरा माणसे उपस्थित होती. दोन फोटोग्राफर, दोन बौद्धाचार्य, एक ब्राह्मण, दोन वाढपी, असे एकूण अठरा जण उपस्थित होते. विवाह बौद्ध धर्म व हिंदू धर्म, अशा दोन्ही पद्धतींनी पार पडला. वधू- वरांच्या मागे मामा उभे असतात. त्यांची कमतरता मंडप तयार करणाऱ्या दोघांना बोलवून, ती उणीव भरून काढली.
कोणीच निमंंत्रित नाही
या दोघांनीही आपापल्या गावी विवाह सोहळा करायचा नाही, असा ठाम निश्चय केला. त्याचे कारण होते सोहळ्यासाठी होणारी न आवरता येणारी गर्दी. त्यांनी कर्जतला लग्न सोहळा करण्याचे निश्चित केले. खरे तर अटकोरेंनी आपल्या सेवा काळात अनेक मित्र मिळविले होते. त्यांना तर बोलवावे लागेल, काय करावे? हे त्यांना सुचत नव्हते. अखेर कुणालाच निमंत्रित करायचे नाही, असे ठरवले.