सिडकोकडून केवळ आश्वासनांची खैरात
By admin | Published: March 25, 2016 01:08 AM2016-03-25T01:08:20+5:302016-03-25T01:08:20+5:30
सिडकोने पनवेल व उरण तालुक्यामधील सार्वजनिक सुविधांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. मूळ गावठाणपासून विकसित नोडमधूनही आवश्यकतेप्रमाणे मैदाने व उद्याने विकसित
- नामदेव मोरे, नवी मुंबई
सिडकोने पनवेल व उरण तालुक्यामधील सार्वजनिक सुविधांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. मूळ गावठाणपासून विकसित नोडमधूनही आवश्यकतेप्रमाणे मैदाने व उद्याने विकसित केलेली नाहीत. चार दशकांमधील अपयश झाकण्यासाठी स्मार्ट सिटीच्या नावाखाली ६५ कोटी खर्च करून दोन वर्षामध्ये ७३ उद्याने व ३३ मैदाने विकसित करण्याची घोषणा केली.
दक्षिण नवी मुंबई (पनवेल तालुका) ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा सिडकोने केली आहे. पुढील पाच वर्षामध्ये या परिसरामध्ये ५३ हजार २४४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामधील जवळपास ३३ हजार कोटी रुपये सिडको स्वत: खर्च करणार आहे. सिडकोने स्मार्ट सिटीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात पनवेल व उरण परिसरातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यात सिडकोला अपयश आले आहे. खारघर ते पनवेल, कळंबोली, कामोठे, तळोजा परिसरामध्ये नागरिकांसाठी मैदानेच नाहीत. मैदाने विकसित करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नोड विकसित करीत असतानाच त्या परिसरामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये उद्याने व मैदाने तयार करण्याची गरज होती. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. खारघरमध्ये करोडो रुपये खर्च करून सेंट्रल पार्कची निर्मिती करण्यात आली. परंतु या उद्यानाची देखभाल दुरुस्तीही सिडको प्रशासनाला करता आलेली नाही. उद्यानावरील सर्व खर्च व्यर्थ गेला
आहे. सेंट्रल पार्कप्रमाणेच इतर उद्यानांचीही दुरवस्था झाली आहे. चांगले उद्यान नसल्याने या परिसरातील नागरिकांना नवी मुंबईतील वंडर्स पार्क, रॉक गार्डन व आर. आर. पाटील उद्यानामध्ये जावे लागत आहे. सिडकोने श्रीमंतांचा खेळ समजल्या जाणाऱ्या गोल्फसाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. देखभालीसाठी प्रचंड खर्च करावा लागत आहे. गोल्फ कोर्सची निर्मिती व देखभालीसाठी जेवढा खर्च केला तेवढा पनवेल परिसरातील एकूण सर्व मैदानांसाठी खर्च झालेला नाही.
नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या सिडकोने स्मार्ट सिटीच्या नावाखाली भव्य स्वप्न दाखविण्यास सुरुवात केली आहे. पुढील दोन वर्षामध्ये ७३ उद्याने विकसित केली जाणार आहेत. यासाठी तब्बल ६५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. चाळीस वर्षात जे शक्य झाले नाही ते दोन वर्षात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता प्रत्यक्षात एवढी उद्याने दोन वर्षात पूर्णत्वास जाण्याची शक्यता नसल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
ड्रीम प्रोजेक्टही फसला
खारघर नोड हा सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर उभारण्याचा संकल्प केला होता. परंतु या ठिकाणीही प्रत्येक सेक्टरमध्ये उद्यान व मैदान विकसित करता आलेले नाही. जगातील सर्वात भव्य उद्यान खारघरमध्ये विकसित करण्याची घोषणा सिडकोने केली होती. इंग्लंंड व अमेरिकेमधील उद्यानांचाही अभ्यास केला होता, त्या धर्तीवर सेंट्रल पार्कची निर्मिती करण्यात आली. परंतु हे उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे झालेच नाही. त्यापेक्षा उत्तम उद्याने नवी मुंबई महानगरपालिकेने उभारली आहेत.
आंदोलन करण्याची गरज
उद्याने व मैदाने प्रत्येक सेक्टरमध्ये व गावांमध्ये
उपलब्ध करून देणे ही सिडकोची जबाबदारी आहे. ज्या सेक्टर व नोडमध्ये उद्याने व मैदाने नाहीत तेथील नागरिक, सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला पाहिजे. यानंतरही सिडकोने दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांनी
व्यक्त केले आहे.