वर्गीकरण केले तरच कचरा उचलणार !, ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी कडक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 02:20 AM2017-10-25T02:20:37+5:302017-10-25T02:20:40+5:30
नवी मुंबई : दोन वर्षे सातत्याने जनजागृती करूनही ओला सुका कच-याचे वर्गीकरण न करणा-यांविषयी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.
नवी मुंबई : दोन वर्षे सातत्याने जनजागृती करूनही ओला सुका कच-याचे वर्गीकरण न करणा-यांविषयी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. सोमवारपासून कचरा न उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साठलेल्या कच-यामुळे दुर्गंधी किंवा रोगराई निर्माण झाल्यास त्याला पूर्णपणे रहिवासी जबाबदार ठरणार आहेत.
देशातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची स्थिती गंभीर झाली आहे. वेळेवर कचरा उचलला जात नाही. उचललेल्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी डंपिंग ग्राउंडची उणीव जाणवू लागली आहे. नवी मुंबईमध्ये मात्र कचराही वेळेवर उचलला जातो व देशातील आदर्श डंपिंग ग्राउंडही याच शहरामध्ये आहे. परंतु डंपिंग ग्राउंडची क्षमता संपली असून नवीन जागा अद्याप शासनाकडून मिळालेली नाही. यामुळे भविष्यात नवी मुंबईलाही कचºयाची विल्हेवाट लावण्याची समस्या भेडसावणार आहे. यामुळेच तुकाराम मुंढे आयुक्त असताना त्यांनी ओला व सुका कचरा वेगळा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वर्गीकरण न केलेल्या सोसायट्यांमधील कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तेव्हा नागरिकांनी जनजागृतीसाठी अजून कालावधी मिळावा, अशी मागणी केली होती. विद्यमान आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीही सहा महिन्यांपासून कचरा वर्गीकरणावर विशेष लक्ष दिले आहे. शहरामध्ये मोठ्याप्रमाणात जनजागृती केली जात आहे. नियमित स्वच्छता मोहिमा राबविल्या जात आहेत. नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी वारंवार सूचना करूनही वर्गीकरण केले जात नसल्याने आता कडक भूमिका घेण्यास सुरवात केली आहे. २४ आॅक्टोबरपासून वर्गीकरण केलेल्या सोसायट्यांमधील कचरा उचललेला नाही. यापुढे कचरा वर्गीकरण झाले तरच उचलला जाईल अशी ठाम भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
महापालिका क्षेत्रामध्ये रोज सरासरी ७०० टन कचरा निर्माण होत आहे. यामधील ५० ते ६० टक्के कचºयाचे वर्गीकरण होत आहे. ४० ते ५० टक्के कचºयाचे अद्याप वर्गीकरण होत नाही. ओला व सुका कचरा एकत्रच टाकल्याने महापालिकेच्या यंत्रणेवर ताण पडत आहे. डंपिंग ग्राउंडवर कचरा वेगळा करावा लागत आहे. अनेक वेळा आहे तसाच कचरा टाकावा लागत आहे. महापालिकेतून मिळालेल्या माहितीप्रमाणे नेरूळ, वाशी व बेलापूर परिसरामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रमाण जास्त आहे.
विशेष म्हणजे दिघा या पूर्णपणे झोपडपट्टी परिसर असलेल्या विभागामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रमाण जास्त आहे. तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली नोडमध्ये अद्याप अपेक्षितपणे कचरा वर्गीकरण होत नाही.
कचरा वर्गीकरण ही प्रत्येकाची जबाबदारी असून पालिकेच्या या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
>दिघावासीयांचा आदर्श
सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये
५० ते ६० टक्के कचºयाचे वर्गीकरण केले जात आहे. नेरूळ, वाशी, सीबीडी या सिडको नोडमध्ये कचरा वर्गीकरण करण्याचे प्रमाण चांगले आहे. याशिवाय दिघा हा पूर्णपणे झोपडपट्टी असलेल्या विभागामध्ये नागरिक ओला व सुका कचरा मोठ्या प्रमाणात वेगळा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिघा मधील नागरिकांप्रमाणे सर्वच शहरवासीयांनी सहकार्य केले तर नवी मुंबईमध्ये शंभर टक्के कचरा वर्गीकरण करणे शक्य होईल, अशी माहिती अधिकाºयांनी दिली.
>आयुक्तांचा पुढाकार
घनकचरा व्यवस्थापनामध्ये आदर्श शहर असा नवी मुंबईचा नावलौकिक व्हावा यासाठी आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी जनजागृतीसह कचरा वर्गीकरणापर्यंत प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिले आहे. घनकचरा उपआयुक्त तुषार पवार यांच्यासह सर्वच अधिकारी, कर्मचारी स्वच्छ नवी मुंबई मिशनसाठी प्रयत्न करत आहेत.
>स्वच्छतेसाठीच्या स्पर्धेला मुदतवाढ
महापालिकेने स्वच्छतेविषयी विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे. ९ ते २८ आॅक्टोबरपर्यंत हॉटेल्स, हॉस्पिटल्स, गृहनिर्माण संस्था, मोहल्ला, मार्केट, मंडई, सार्वजनिक, सामुदायिक शौचालये, उद्यान व प्रभाग या आठ गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेमध्ये स्थळ परीक्षण व गुणांकन ३० आॅक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. विभाग स्तरावर पहिल्या ते दुसºया क्रमांकासाठी अनुक्रमे २५, १५ ते १० हजार रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे. शाळा गटासाठी १५ व १० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. महापालिका स्तरावरील स्पर्धेसाठी गृहनिर्माण सोसायट्यांसाठी १ लाख, ७५ हजार व ५० हजार रूपये बक्षीस देण्यात येणार आहे. शाळांसाठी अनुक्रमे २५ व २० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
>केंद्र शासनाच्या नियमांप्रमाणे कचरा निर्मितीच्या ठिकाणीच ओला व सुका कचरा वेगळा करणे आवश्यक आहे. दोन वर्षांपासून महापालिका नागरिकांना आवाहन करत आहे. अनेकांनी वर्गीकरण सुरूही केले आहे. परंतु वारंवार सूचना देवूनही वर्गीकरण न करणाºया सोसायटीमधील कचरा न उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
- अंकुश चव्हाण,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका