वॉक विथ कमिशनरमध्ये फक्त नऊच तक्रारी
By admin | Published: February 19, 2017 03:48 AM2017-02-19T03:48:44+5:302017-02-19T03:48:44+5:30
तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये आयोजित वॉक विथ कमिशनर उपक्रमासाठी बघ्यांची गर्दी जमली होती; पण त्यामधील फक्त ९ नागरिकांनीच तक्रारी सादर केल्या. आयुक्त तुकाराम मुंढे
नवी मुंबई : तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये आयोजित वॉक विथ कमिशनर उपक्रमासाठी बघ्यांची गर्दी जमली होती; पण त्यामधील फक्त ९ नागरिकांनीच तक्रारी सादर केल्या. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाठ फिरवताच परिसरातील बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली असून रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
महापालिका आयुक्तांनी सिडको विकसित नोडनंतर आता झोपडपट्टी परिसरात ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे; पण आयुक्त झोपडपट्टी परिसरात येणार असल्याने आनंद होण्याऐवजी रहिवाशांच्या पोटात गोळा येऊ लागला आहे. पहिलाच उपक्रम यादवनगरमध्ये राबविण्यात आला व दुसऱ्या दिवसापासून त्या परिसरातील बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली. कारवाई करताना अतिश्रमामुळे पालिकेचे सहायक आयुक्त दत्तात्रेय नांगरे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. या नंतर ११ फेब्रुवारीला दुसरा दौरा तुर्भे स्टोअर्समध्ये घेण्यात आला होता; पण नागरिकांमध्ये असंतोष असल्याने व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने ‘वॉक विथ कमिशनर’ला स्थगिती देण्यात आली होती. १८ तारखेला हा उपक्रम राबविण्यात आला. पालिका शाळेच्या बाहेर आयुक्तांनी रहिवाशांशी संवाद साधला. आयुक्त काय भूमिका घेणार हे पाहण्यासाठी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती; पण प्रत्यक्षात ९ नागरिकांनीच तक्रारी सादर केल्या. आयुक्तांच्या उपक्रमाला मिळालेला हा सर्वात अल्प प्रतिसाद आहे. आयुक्तांकडे सुविधा मागण्यासाठी गेल्यास ते अतिक्रमणावर बोट ठेवणार व आपल्या झोपड्या हटविणार या भीतीने नागरिकांनी तक्रारी न देणेच पसंत केल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांची संवाद साधताना आयुक्तांनी पालिकेने सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना नळजोडणी सुरू केली आहे. वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी १७ हजार रुपये अनुदान दिले जात असल्याची माहिती दिली. तुर्भे डम्पिंग ग्राऊंड देशातील आदर्श प्रकल्प असल्याचेही त्यांनी या वेळी रहिवाशांना सांगितले. सन २००० पर्यंतच्या झोपड्यांना शासनाने अभय दिले असून त्या व्यतिरिक्त झालेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. आयुक्तांनी पाठ फिरविताच महापालिका प्रशासनाने या विभागातील नागरिकांनी केलेल्या वाढीव बांधकामांवर कारवाई सुरू केली. झोपड्यांच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी बसविण्यात आलेल्या शिड्या तोडण्यात आल्या. या कारवाईमुळे रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आयुक्त तक्रारी निवारणासाठी आले होते की तक्रारी वाढविण्यासाठी असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
निवडणूक प्रचारासाठी शहराबाहेर असल्याने ‘वॉक विथ कमिशनर’मध्ये काय झाले ते समजले नाही; परंतु आयुक्त जाताच बांधकामांवर कारवाई सुरू झाल्याचे नागरिकांनी सांगितले. रहिवाशांवर अशाचप्रकारे अन्याय सुरू राहिला तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
- सुरेश कुलकर्णी,
नगरसेवक, राष्ट्रवादी काँगे्रस