शहरातील एकमेव तुर्र्भे एसटी स्थानकाची झाली भग्नावस्था; महामंडळाकडून वापर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 11:39 PM2020-12-26T23:39:26+5:302020-12-26T23:39:34+5:30
शहरातील एकमेव बसस्थानकाचे देखभालीअभावी वाईट अवस्थेत रूपांतर झाले आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : नवी मुंबईमधील एकमेव एस.टी. बस स्थानकाची भग्नावस्था झाली आहे. महामंडळाकडून स्थानकाचा वापरच केला जात नाही. सद्यस्थितीमध्ये या स्थानकामध्ये अवैधपणे वाहन पार्किंग सुरू आहे. कार्यालयाची इमारत मोडकळीस आली असून, संरक्षण भिंतीलाही अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे.
नवी मुंबईमधील प्रवाशांच्या सुविधेसाठी सिडकोने महाराष्ट्र राज्य परिवहन उपक्रमास तुर्भेमध्ये मोक्याच्या ठिकाणी भूखंड उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय कोपरीजवळही विस्तीर्ण भूखंड दिला आहे. तुर्भेमधील भूखंडावर छोटे कार्यालय उभारून बस स्थानक सुरू करण्यात आले होते, परंतु महामंडळाने दुर्लक्ष केल्यामुळे या स्थानकाचा योग्य वापर करण्यात आला नाही. परिणामी, बसस्थानकाचा वापर थांबविण्यात आला असून, बसेस महामार्गावर रोडवर उभ्या करण्यास सुरुवात झाली आहे.
शहरातील एकमेव बसस्थानकाचे देखभालीअभावी वाईट अवस्थेत रूपांतर झाले आहे. बसस्थानकाच्या सुरक्षेसाठी काहीही यंत्रणा अस्तित्वात नाही. यामुळे येथील कार्यालयाची तोडफोड झाली असून, फक्त भिंती शिल्लक राहिल्या आहेत. बसस्थानकामध्ये रेती, खडी, दगड वाहतूक करणारी वाहने अनधिकृतपणे उभी राहात आहेत. आंबा हंगामामध्ये खोकी बनविणारे विक्रेते या भूखंडाचा वापर करत असतात. शहरात बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांना मात्र रोडवर उभे राहून बसेसची वाट पाहावी लागत असून, त्यामुळे वाशी, सानपाडा, नेरुळमध्ये वारंवार वाहतूककोंडी होत आहे.