तुर्भेतील पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:21 PM2019-12-17T23:21:03+5:302019-12-17T23:21:31+5:30
आयुक्तांकडून जागेची पाहणी : फेरनिविदा काढून काम सुरू करण्याचे आश्वासन
नवी मुंबई : तुर्भे स्थानकाबाहेरील पुलाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाण्याचे आश्वासन पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले आहे. त्याकरिता प्रस्तावित कामाची फेरनिविदा काढून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्या अनुषंगाने आयुक्त मिसाळ यांनी मंगळवारी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून आढावा घेतला.
ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर येथे तुर्भे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. रस्ता अरुंद असल्याने सकाळ, संध्याकाळी रहदारीच्या वेळी त्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत. यामुळे परिसरातील ध्वनी व वायुप्रदूषणात वाढत होत आहे. तसेच त्या ठिकाणी नागरिकांकडून रस्ता ओलांडला जात असल्याने अपघाताच्याही घटना घडत आहेत. यामध्ये लहान मुलांसह महिला व पुरुष अशा अनेकांचे प्राणही गेले आहेत. ठाणे-बेलापूर मार्गामुळे रेल्वेस्थानक व लोकवस्तीचा भाग विभागला गेला आहे. यामुळे शाळकरी मुलांसह चाकरमान्यांना रेल्वेस्थानकात जायचे असल्यास मार्ग ओलांडावा लागत आहे. यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी त्या ठिकाणी पादचारी पूल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती; परंतु अनेकदा निविदा काढूनही ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने प्रत्यक्षात काम होऊ शकले नाही. तर मागील काही वर्षात तिथल्या परिस्थितीतही अनेक बदल झाले आहेत. यामुळे सदर ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे तिथल्या वाहतूककोंडीची समस्या मिटून पादचाऱ्यांवरील मृत्यूची टांगती तलवारही हटणार आहे.
त्या ठिकाणी पादचारी पूल अथवा उड्डाणपूल उभारून सातत्याने होणाºया अपघातांच्या घटनांना आळा घालावा, यासंबंधीची मागणी स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्याकडून सातत्याने होत होती; परंतु पादचारी पुलासाठी ठेकेदार मिळत नसल्याच्या कारणावरून प्रशासनाकडून प्रत्यक्षात कामाला दिरंगाई होत होती. यामुळे त्या ठिकाणी अनेकदा आंदोलने करून रास्ता रोकोही करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांची गरज लक्षात घेऊन पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मंगळवारी तुर्भे स्टोअर येथील पुलाच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली. या वेळी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह शहर अभियंता सुरेंद्र पाटील, दादासाहेब चाबुकस्वार, संजय देसाई व पालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. त्यांनी परिसरातील इतरही आवश्यक कामांचा आढावा घेतला. तर रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होणारे अपघात टाळण्यासाठी त्या ठिकाणी लवकरच उड्डाणपूल उभारला जाईल, असे आश्वासनही दिले. त्याकरिता फेरनिविदा काढून पात्र ठेकेदाराला कंत्राट देऊन लवकरच कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाईल, असेही आश्वासन दिले.