सेंट्रल पार्कचे लोकार्पण लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 02:07 AM2018-02-22T02:07:58+5:302018-02-22T02:07:58+5:30
पालिकेच्या वतीने घणसोलीत सुरू असलेल्या सेंट्रल पार्कचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पुढील दोन महिन्यांत त्याचे लोकार्पण केले जाणार आहे
नवी मुंबई : पालिकेच्या वतीने घणसोलीत सुरू असलेल्या सेंट्रल पार्कचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पुढील दोन महिन्यांत त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. या अनुषंगाने तिथल्या कामांची पाहणी आमदार संदीप नाईक यांच्यासह महापौर जयवंत सुतार यांनी बुधवारी केली. या वेळी त्यांनी पार्कमधील कामाचा दर्जा राखण्याच्या सूचना ठेकेदाराला केल्या.
घणसोली सेक्टर ३ येथे पालिकेच्या वतीने भव्य सेंट्रल पार्क उभारणीचे काम सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या कामात सुरुवातीच्या दोन वर्षांत अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर मागील वर्षभरात प्रत्यक्षात कामाला गती मिळाली आहे. या पार्कच्या कामासाठी आमदार संदीप नाईक यांनी महापालिकेला राज्य शासनाचाही निधी मिळवून दिलेला आहे. त्यानुसार पंचमहाभुतांवर आधारित संकल्पनेनुसार हे पार्क विकसित केले जात आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन महिन्यांत त्याचे लोकार्पण केले जाण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात भूखंड हस्तांतरणाचा तिढा व त्यानंतर दोनदा रचनेत झालेला बदल यामुळे पार्कच्या कामाला अपेक्षित गती मिळाली नव्हती. यामुळे कामासाठी देण्यात आलेला कालावधी संपल्याने दिलेल्या मुदतवाढीत पार्कचे काम पूर्ण होत आहे. त्याकरिता घाईमध्ये होणाºया कामाच्या दर्जात तडजोड केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची पाहणी करण्यासाठी आमदार संदीप नाईक यांनी महापौर जयवंत सुतार यांच्या उपस्थितीमध्ये दौरा केला. त्यास शहर अभियंता मोहन डगावकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते. या वेळी पार्कच्या दुसºया टप्प्याचेही शिल्लक काम उर्वरित कालावधीत पूर्ण करून मुलांची गैरसोय टाळण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी केल्या. तसेच पार्कच्या देखभालीचा खर्च डोईजड होऊ नये, यासाठी तिथल्या पार्टी लॉनच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी प्रशासनाला सुचवले. या वेळी पार्टी लॉनच्या जागेचे योग्य प्रकारे सपाटीकरण झालेले नसल्याचे निदर्शनास आणून त्यात सुधार करण्याच्या सूचना ठेकेदाराला केल्या. या वेळी उद्यानातील काही बाबीवरून महापौर जयवंत सुतार यांनीही ठेकेदाराला धारेवर धरून आवश्यक सूचना केल्या. तर शहर अभियंता मोहन डगावकर यांनी मानवी चेहºयाच्या पुतळ्यावरून ठेकेदाराला खडेबोल सुनावत त्यात सुधाराच्या सूचना केल्या.