ऑपरेशन ऑल आऊट: खबरदारी न घेणाऱ्या ११०४ जणांवर कारवाई, मास्क न वापरणाऱ्या ६६९ जणांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 02:25 AM2021-03-28T02:25:36+5:302021-03-28T02:26:04+5:30
नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पोलीस आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ऑपरेशन ऑल आऊट राबवले जात आहे.
नवी मुंबई : कोरोनाच्या अनुषंघाने कसलीही खबरदारी न घेता बेजबाबदारपणे वावरणाऱ्यांवर महापालिका व पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार राबवले जात असलेल्या ऑपरेशन ऑल आऊटच्या पहिल्याच दिवशी ११०४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात मास्क न वापरणाऱ्या ६६९ जणांचा समावेश आहे.
नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पोलीस आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ऑपरेशन ऑल आऊट राबवले जात आहे. या मोहिमेत ७००हून अधिक पोलीस, ७५ पालिका अधिकारी व पोलीस मित्र यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी कोणतीही खबरदारी न घेता वावरणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जात आहे. त्यानुसार ऑपरेशनच्या पहिल्याच दिवशी एकूण ११०४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
त्यात मास्क न वापरता अथवा अर्धवट मास्क लावून वावरणाऱ्या ६६९ जणांचा समावेश आहे. नवी मुंबईतली सर्वच पोलीस ठाणे हद्दीत अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुरेपूर खबरदारी घेऊन नियमांचे पालन करण्याच्या सूचना महापालिका व पोलीस प्रशासनाकडून केल्या जात आहेत. त्यानंतरही कारवाईला न जुमानता अनेक जण बेजबाबदारपणे वावरत आहेत. त्यामुळे ऑपरेशन ऑल आऊटच्या माध्यमातून अशा व्यक्तींवर कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे. त्यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या ३४ आस्थापनांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर न राखणाऱ्या २६० जणांवर कारवाई झाली आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. यामुळे पालिका व पोलीस संयुक्तरीत्या विशेष मोहीम राबवत आहेत. त्याअंतर्गत ११०४ जणांवर विविध कलमांतर्फे कारवाई केली आहे. यापुढेही कारवाईत सातत्य राहणार आहे. - सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त