खारघरच्या आदिवासी पाड्यात नेत्रचिकित्सा
By Admin | Published: March 30, 2016 01:18 AM2016-03-30T01:18:21+5:302016-03-30T01:18:21+5:30
नेरूळ येथील युथ कौन्सिल संस्थेच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून रविवारी खारघर येथील आदिवासी पाड्यात नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
नवी मुंबई: नेरूळ येथील युथ कौन्सिल संस्थेच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून रविवारी खारघर येथील आदिवासी पाड्यात नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नेरूळ परिसरातील नेत्र चिकित्सालयांच्या संयुक्त सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
खारघर येथे हेदोरोवाडी हा आदिवासी पाडा आहे. युथ कौन्सिल संस्थेने हा पाडा दत्तक घेतला आहे. त्यामुळे गेल्या १७ वर्षांपासून संस्थेच्या वतीने या पाड्याच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विशेषत: येथील आदिवासींच्या आरोग्यावर अधिक भर दिला जात आहे. त्यानुसार रविवारी नेत्र चिकित्सा आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५३ आदिवासींची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३५ जणांना मोफत चष्मे देण्यात आले. उर्वरित १0 जणांच्या डोळ्यांची रुग्णालयीन तपासणी करून सात जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले. डॉ. विवेक पाटील, डॉ. एकता पांडे, भावेश संगार, रेखा पंडित, अर्चना भगत, अनुराग सिंह, महेंद्र कदम, केशव शिंदे व भूषण फडतरे आदीच्या चमूने शिबिरार्थींची तपासणी केली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख यांच्यासह रमेश सुर्वे, जी.आर.पाटील, विक्रम राम, नंदकुमार वेदपाठक, सुरजीतसिंह उभी, सदानंद शाहीर, गोपाळ देऊळकर आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)