चाकरमान्यांच्या मतांवर ग्रामीण नेत्यांची भिस्त, नवी मुंबईमधील बैठका वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 05:29 AM2019-03-19T05:29:05+5:302019-03-19T05:29:19+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नेत्यांनी मुंबईसह नवी मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

 In the opinion of the Chackarmen, the meeting of rural leaders increased in Navi Mumbai | चाकरमान्यांच्या मतांवर ग्रामीण नेत्यांची भिस्त, नवी मुंबईमधील बैठका वाढल्या

चाकरमान्यांच्या मतांवर ग्रामीण नेत्यांची भिस्त, नवी मुंबईमधील बैठका वाढल्या

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई  - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नेत्यांनी मुंबईसह नवी मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबईसह पनवेलमधील बैठकांचे प्रमाण वाढले आहे. पक्षांचे नेते व उमेदवार बैठकांना उपस्थित राहून नागरिकांना गावच्या विकासाचे साकडे घालत आहेत.

मुंबई, नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकणामधील चाकरमान्यांची संख्या लक्षणीय आहे. सातारा, पुणे, हातकणंगले, माढा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये चाकरमान्यांची मते निर्णायक ठरत आहेत. सातारा व माढा मतदार संघामधील अनेक गावांमधील ७० ते ८० टक्के नागरिक वास्तव्यासाठी मुंबई, नवी मुंबईमध्ये आहेत. अनेकांची दोन्ही ठिकाणी मतदार संघामध्ये नावे आहेत. यामुळे ग्रामीण भागामधील नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. शिरुर मतदार संघामधील शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही वाशीमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन केले होते. याशिवाय माढा मतदार संघामधील कार्यकर्त्यांचा व माथाडी कामगारांचा मेळावा राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये कळंबोलीमध्ये आयोजित केला होता. या मेळाव्यामध्येही माथाडी कामगारांना गावाकडे चलाचे आवाहन करण्यात आले होते. सातारा - जावली मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक महिन्यामध्ये दोन वेळा नवी मुंबईमध्ये हजेरी लावून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. सातारा व पुणे जिल्ह्यामधील चाकरमान्यांच्या विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. यावेळी मुंबई व गावाकडील मतदानाच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. यामुळे सर्वप्रथम गावी येवून मतदानामध्ये सहभाग घ्यावा. गावच्या विकासामध्ये सर्वांचे योगदान हवे, असे भावनात्मक आवाहन केले जात आहे.

यापूर्वी गावाकडील पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गावचे राजकारण चालत होते, परंतु मागील काही वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आहे. मुंबईमध्ये रोजीरोटीसाठी आलेल्या नागरिकांनी आर्थिक प्रगती केल्याने गावच्या राजकारणामध्ये चाकरमान्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. २००० च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माथाडी कामगारांनी गावी जाऊन निकाल बदलला होता. तेव्हापासून ग्रामीण नेत्यांनी मुंबईमधील चाकरमान्यांशी संवाद वाढविण्यास सुरुवात केली. मुंंबईकरांचे मत वळविले की पूर्ण गावचे मत वळते असे समीकरण अनेक ठिकाणी निर्माण झाल्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांनी मेळावे व बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईकरांना गावी घेऊन जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यापासून सर्व प्रकारची मदत देण्याची तयारीही दाखविली जात आहे. राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना व भाजपाने चाकरमान्यांची मते मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून ही मते नक्की कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरुरमध्ये लागणार कसोटी
सातारा, माढा, हातकणंगले, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, शिरुर, बारामती मतदार संघामध्ये चाकरमान्यांची मते निर्णायक ठरत आहेत. या मतदार संघामधील नवी मुंबई, पनवेल, ठाणे व मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्यांची संख्या जास्त आहे. गावाकडील व मुंबई, नवी मुंबईमधील मतदानाची तारीख वेगळी असल्यामुळे उमेदवारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. फक्त शिरुर व मुंबई, नवी मुंबईमधील मतदान एकाच दिवशी असल्यामुळे त्या मतदार संघातील उमेदवारांची मतदार गावी घेऊन जाण्यासाठी कसोटी लागणार आहे.

माथाडी मेळाव्याकडेही लक्ष
२३ मार्चला माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांची पुण्यतिथी आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये माथाडी मेळाव्यामधून राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रचारास आरंभ केला जात होता. यावर्षी माथाडी संघटना भाजपा व राष्ट्रवादी अशा दोन पक्षांमध्ये विभागली आहे. यामुळे माथाडी मेळाव्यामध्ये नक्की कोणती भूमिका घेतली जाणार याविषयी उत्सुकता असून कामगार माथाडी नेत्यांचे ऐकणार की स्वत:ची भूमिका स्वत: ठरविणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title:  In the opinion of the Chackarmen, the meeting of rural leaders increased in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.