नवी मुंबई : नगरसेवकांनी लेखी स्वरूपात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून न दिल्यामुळे शिवसेना - भाजपा सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. ४८ नगरसेवकांनी तब्बल १७९ प्रश्न विचारले होते. परंतु त्यासाठी फक्त अर्धा तास वेळ दिल्यामुळे विरोधकांनी महापौरांना घेराव घालून पक्षपात केला जात असल्याचा आरोप केला. पालिकेच्या कामकाजामध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला विशेष महत्त्व आहे. नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांनी मोठ्याप्रमाणात प्रश्न विचारण्यास सुरवात केली आहे. जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये ४८ नगरसेवकांनी तब्बल १७९ प्रश्न उपस्थित केले होते. परंतु यावरील उत्तरे देण्यासाठी फक्त अर्धा तास वेळ देण्यात आला. रवींद्र इथापे यांनी त्यांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे जवळपास २० मिनिटे चर्चा केली. उर्वरित प्रश्नांचे निरसन करण्यासाठी वेळ न मिळाल्यामुळे शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही वेळ सभात्याग केला व नंतर महापौरांना घेराव घालून निषेध व्यक्त केला. महापौरांनी सभेच्या शेवटी प्रश्नोत्तरे घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर विरोधक शांत झाले. सभेचे कामकाज संपल्यानंतर प्रश्नोत्तरांचा तास पुन्हा घेण्याचे आश्वासन महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिले होते. परंतु शेवटी विरोधकांनीही त्याचा आग्रह धरला नाही व महापौरांनीही प्रश्नोत्तरे घेतली नाहीत. यामुळे विरोधकांनी आंदोलनाची स्टंटबाजी केल्याची चर्चा प्रेक्षागृहात सुरू झाली. (प्रतिनिधी)
प्रश्नोत्तरांवरून विरोधक आक्रमक
By admin | Published: July 21, 2015 4:13 AM