नागोठणे : येथील केटी बंधारा ते जेएसडब्ल्यू कंपनी, डोलवी अशी नव्याने जलवाहिनी टाकली जात असून नागोठणे ते शेतपळस दरम्यान या भागातील शेतकऱ्यांनी काही हरकती घेतल्यामुळे काम बंद ठेवण्यात आले आहे. जलवाहिनीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे असल्याने याबाबत रोहे प्रांताधिकारी सुभाष भागडे यांनी जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी तसेच बाधित शेतकऱ्यांची गुरु वारी रोहे येथे बैठक घेतली. ही जलवाहिनी मुंबई - गोवा महामार्गालगत टाकली जात असून महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आम्ही जागा दिली आहे. येथे जेएसडब्ल्यूची खासगी जलवाहिनी टाकली जात असल्याने याबाबत बाधित शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच एकजूट दाखवीत या बैठकीत त्याला हरकती घेतल्यामुळे संबंधित प्रश्न अद्यापि मार्गी लागलेला नाही. जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण होण्यासंदर्भात नागोठणे व शेतपळस येथील बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीचे रोहे येथील उपविभागीय कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बाधित शेतकरी संतोष गुरव यांच्या नेतृत्वाखाली समीर नागोठकर, धर्मा भोपी, असिफ अधिकारी, रु चिर मोरे, कृष्णा धामणे, इन्तिखाब अधिकारी, अनिल ठोंबरे, मधुकर काळे, राजन उपाध्ये, मिलिंद ताले, दिनेश झोलगे, अनिल काळे, मंगेश कामथे, श्रीकांत रावकर, हेमंत वाळंज आदींसह इतर शेतकऱ्यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हरकती संदर्भातले निवेदन सादर केले आहे. त्यात शासनाच्या मागणीनुसार आमची घरे तसेच जमीन महामार्गासाठी दिली असून अन्य कोणत्याही खासगी कंपनीला दिलेली नाही. या पाइपलाइनमुळे संपादित केलेल्या जागेव्यतिरिक्त अन्य जागेची सुद्धा नासधूस होत असली तरी कंपनी कोणत्याही प्रकारची भरपाई देत नाही. ज्या लोकांची राष्ट्रीय महामार्गासाठी जागा संपादित झालेली नाही अशा लोकांची जमीन या जलवाहिनीसाठी संपादित केली जात आहे, ही अन्यायकारक बाब आहे.जलवाहिनी टाकताना कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतली नसल्यामुळे आमच्या जागेत नियमबाह्य पद्धतीने जलवाहिनी टाकू नये. महामार्गासाठी घेतलेली उर्वरित जागा स्थानिक जनतेसाठी रहदारीचा रस्ता असल्याने याच जागेतून ही जलवाहिनी जात असल्याने आमची त्याला हरकत आहे असे नोंदविले आहे.यावेळी संबंधित ५० ते ६० बाधित शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
जेएसडब्ल्यूच्या जलवाहिनीला विरोध
By admin | Published: April 08, 2016 1:44 AM