शेकापला रोखण्याची विरोधकांची धडपड
By admin | Published: November 18, 2016 03:33 AM2016-11-18T03:33:05+5:302016-11-18T03:33:05+5:30
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, महाड, रोहा, मुरुड, पेण, खोपोली, अलिबाग, उरण आणि माथेरान या
जयंत धुळप /अलिबाग
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, महाड, रोहा, मुरुड, पेण, खोपोली, अलिबाग, उरण आणि माथेरान या नगरपरिषदांच्या थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडीकरिता येत्या रविवारी २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रचार सर्वत्र सुरू झाला आहे; परंतु प्रचारात उत्साह मात्र दिसून येत नाही. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वरच्या स्तरावर विचारविनिमय करून केलेल्या आघाड्या आणि युत्यांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना अपेक्षेप्रमाणे विचारात घेतले नाही असा या आघाड्या आणि युत्यांमधील सर्वच राजकीय पक्षांमधील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुप्त सूर आहे, तर आपल्या घराण्यांच्या राजकीय प्रतिष्ठेकरिता नेत्यांनी केवळ आपलाच विचार केला, अशीही एक भावना कार्यकर्त्यांची आहे. परिणामी, यंदाच्या या नगरपरिषद निवडणुकांमध्ये जिल्ह्यात ‘कार्यकर्त्यांची निष्ठा आणि राजकीय घराण्यांची प्रतिष्ठा’ अशीच निवडणूक अनुभवास येत आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील या जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांनी नगरपरिषद निवडणुकीकरिता आघाडी करून निवडणुकीची रणनीती आधीपासून आखून कामास प्रारंभ केला. गेल्या ३० वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेली अलिबाग नगरपरिषद शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या प्रतिष्ठेची, तर रोहा आणि श्रीवर्धन या नगरपरिषदा आ. सुनील तटकरे यांच्या प्रतिष्ठेच्या नगरपरिषदा आहेत. अलिबागमध्ये शेकाप आ. जयंत पाटील यांचे मेव्हणे प्रशांत नाईक हेच विद्यमान नगराध्यक्ष असून त्यांची या वेळची थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी सुमारे महिनाभर आधीच जाहीर करून शेकापने उमेदवारी जाहीर करण्यात पहिली बाजी मारली. अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा अॅड. नमिता नाईक यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनामुळे अलिबागकर नागरिकांना मोठा धक्का बसला होता. त्याचबरोबर शेकापचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रशांत नाईक व्यक्तिगत पातळीवर ‘व्यक्ती’ म्हणून अन्य राजकीय पक्षांकडून नसलेल विरोध या नाईक यांच्या मोठ्या जमेच्या बाजू आहेत.
शेकापला अलिबागमधून हद्दपार करण्याकरिता सर्व पक्षांनी एकत्र येऊन अलिबाग शहर संघर्ष समिती स्थापन करावी, असा विचार पुढे आला. महिनाभर खलबते झाली आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीपर्यंत एकमत झाले नाही आणि अखेर उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर शिवसेनेने अलिबाग शहर संघर्ष समितीला जय महाराष्ट्र केला आणि शेकापविरोधी सर्वपक्षीय आघाडीत बिघाडी झाली.
शिवसेनेने थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार अॅड. सुशील पाटील यांच्यासह नगरसेवकपदाचे पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले. नगरसेवकपदाच्या सर्व म्हणजे १७ जागांकरिता उमेदवार उभे करता आले नाहीत, याचे खापर शिवसेनेने अखेर अलिबाग शहर संघर्ष समितीवरच फोडले आहे. शिवसेनेचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले अॅड. सुशील नाईक काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीबरोबर फारकत घेऊन शिवसेनेत दाखल झालेत. केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना मतदारांनी दिलेली अधिक मते आणि विधानसभेला सेनेच्या पारड्यांत टाकलेली मते हे अंकगणित, अलिबागचा विकास आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांची प्रचारसभेच्या जोरावर थेट नगराध्यक्ष व पाच नगरसेवक निवडून येणार असा दावा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुकाप्रमुख दीपक रानवडे, शहरप्रमुख कमलेश खरवले यांचा आहे.