कर्जमाफीसाठी विरोधकांची स्टंटबाजी

By admin | Published: April 20, 2017 03:25 AM2017-04-20T03:25:47+5:302017-04-20T03:25:47+5:30

कर्जमाफीचे आंदोलन म्हणजे विरोधकांचा स्वत:चा पक्ष बळकटीसाठी अवलंबलेला चुकीचा मार्ग असल्याचा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मारला आहे

Opponents stunts for debt relief | कर्जमाफीसाठी विरोधकांची स्टंटबाजी

कर्जमाफीसाठी विरोधकांची स्टंटबाजी

Next

नवी मुंबई : कर्जमाफीचे आंदोलन म्हणजे विरोधकांचा स्वत:चा पक्ष बळकटीसाठी अवलंबलेला चुकीचा मार्ग असल्याचा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मारला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून राज्यात अनावश्यक मागणी पुढे आणली जात आहे. त्यामुळे आंदोलनाचा तिसरा टप्पा असल्यास तो रद्द करावा असा सल्लाही त्यांनी एपीएमसी येथे कार्यक्रमात दिला.
कर्जमाफीसाठी सरकार बांधील असून त्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. त्यापूर्वी शेतकरी सशक्त करण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची सवय लागली आहे. त्यापैकी जे कर्जाची परतफेड करू शकत नाहीत अशांना खऱ्या अर्थाने कर्जमाफी मिळण्याची गरज असल्याचे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. मात्र विरोधकांनी गरज नसतानाही सरसकट कर्जमाफीची मागणी करून तसे वातावरण तयार केले आहे. शिवाय उत्तर प्रदेशमधील निर्णयाची तुलना महाराष्ट्रासोबत केली जात आहे. यामुळे विरोधकांचे सुरू असलेले आंदोलन म्हणजे स्वत:चा पक्ष बळकट करण्यासाठी अवलंबलेला चुकीचा मार्ग असल्याचेही ते म्हणाले. राज्यातला शेतकरी संकटात असून प्रत्येक गावा- गावांमध्ये पाणी पोचवण्याची गरज आहे. त्याकरिता शहरात राहणाऱ्या प्रत्येकाने स्वत:चे गाव समृध्द करण्यावर भर दिला पाहिजे, त्यासाठी सरकार पाठीशी असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली. यामुळे सुरू असलेल्या आंदोलनाचा तिसरा टप्पा असल्यास तो थांबवण्याचा सल्ला त्यांनी दिला. बुधवारी एपीएमसी येथे माथाडी भवनमधील कै. शिवाजीराव पाटील सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रामुख्याने उपस्थित होते.
आत्महत्या थांबवण्यासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे, त्याठिकाणी शेतकऱ्यांसाठी समुपदेशक नेमले आहेत. त्याशिवाय सरपंचांकडे ठरावीक रक्कम देवून एखादा शेतकरी आर्थिक संकटात असल्यास त्याला मदतीची तरतूद केलेली असल्याचेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड, गुलाबराव जगताप आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Opponents stunts for debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.