अकरावी प्रवेशाकरिता दहा कॉलेजमध्ये संधी
By admin | Published: April 21, 2017 12:30 AM2017-04-21T00:30:05+5:302017-04-21T00:30:05+5:30
दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा आलेख वाढत चालल्याने मागील दोन ते तीन वर्षांपासून अकरावी प्रवेशासाठी पनवेल परिसरातील प्रमुख महाविद्यालयांतील कटआॅफने उच्चांक गाठला होता
कळंबोली : दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा आलेख वाढत चालल्याने मागील दोन ते तीन वर्षांपासून अकरावी प्रवेशासाठी पनवेल परिसरातील प्रमुख महाविद्यालयांतील कटआॅफने उच्चांक गाठला होता. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुलभ पारदर्शक व्हावी, या उद्देशाने आता शिक्षण विभागातर्फेयंदा केंद्रीभूत आॅनलाइन पद्धतीमुळे प्रवेश घेणे सुकर होणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना एका अर्जाद्वारे दहा महाविद्यालयांत पसंतीक्र म नोंदविता येणार असून प्रवेशाची संधी मिळेल. तसेच पहिल्या फेरीनंतर शाखा बदलण्याचा अधिकारही विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.
पनवेल परिसरातील ठरावीक कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशाकरिता अधिक ओढा असतो. त्याचबरोबर विद्यार्थी संख्या जास्त आणि जागा कमी असल्याने प्रवेशाकरिता अनेक अडचणी येतात. प्रवेश प्रक्रि येत गोंधळ निर्माण झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. गेल्या वर्षी कळंबोली येथील एका विद्यार्थिनीने ८२ टक्के गुण मिळूनही प्रवेश मिळत नसल्याची भीती मनात घेवून आत्महत्या केली होती. या प्रकरण विधानसभेत गाजले होते. त्याचबरोबर मुख्याध्यापकांना अटक झाली होती. त्यामुळे यंदा शिक्षण विभागाने विशेष खबरदारी घेतली आहे. दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीचे प्रवेश आॅनलाइन पद्धतीने होणार आहे. याकरिता कनिष्ठ महाविद्यालयांनी आॅनलाइन प्रक्रि येसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना आॅनलाइन फॉर्म उपलब्ध करून दिले जाणार असून त्याआधारे १५ जून ते १५ जुलै या कालावधीत चार फेऱ्यांमध्ये ही प्रवेश प्रक्रि या पूर्ण करण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशाची यंदा प्रथमच आॅनलाइन पद्धतीने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रि या होणार आहे.
आॅनलाइन प्रवेशप्रक्रि येसाठी शहराबाहेरील विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येईल. या प्रक्रियेविषयी प्रत्येक शाळेत माहिती पुस्तिका पोहोचविल्या जातील. प्रवेश प्रक्रि येस प्रारंभ होण्यापूर्वी कनिष्ठमहाविद्यालयांनी आपल्या युजर आयडी पासवर्डद्वारे आॅनलाइन नोंदणी केली आहे.
मुख्याध्यापकांची बैठक
काही दिवसांपूर्वी पनवेल आणि नवी मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची ऐरोली येथे शिक्षण विभागाने बैठक बोलावली होती. उपसंचालक बी.बी. चव्हाण आणि सहाय्यक उपसंचालक अहिरे यांनी अकरावी प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले.
त्यांना विविध प्रकारचा सूचना यावेळी देण्यात आल्या असून शंभर टक्के प्रवेश आॅनलाइनच होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आल्याची माहिती तालुका गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी सांगितले.
शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार कनिष्ठ महाविद्यालयात दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची कार्यशाळा घेण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रि या नेमकी कशी असणार आहे याबाबत इत्थंभूत माहिती देण्यात येत आहे.