सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मंगळवारी रात्रीपासून सर्वसामान्यांची तारांबळ उडाली. शासनाच्या निर्णयामुळे आपल्याकडील ५०० व १००० च्या नोटा पडून राहतील या भीतीने अनेकांनी खरेदीवर जोर दिला, तर नागरिकांचा खरेदीकडे वाढलेला कल पाहून काही मॉल मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात आले होते. नोटांऐवजी ई-वॉलेट वापरण्याच्या आॅफर आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून ग्राहकांना मिळू लागल्या आहेत.केंद्र सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासूनच काळ्या पैशाच्या धन्यापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचीच तारांबळ उडाली. निर्णयाची माहिती मिळताच सर्वसामान्यांनी त्यांच्याकडील ५००, १००० च्या नोटा तत्काळ वापरात आणण्यासाठी धाव घेतली. यामुळे मॉल, दुकाने यासह सोनारांकडे काही तासात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. काहींनी वाहनात इंधन भरून पेट्रोलपंपावर नोटा चालवण्याचा पर्याय निवडला. यावेळी ग्राहकांकडून किरकोळ खरेदीवर सुध्दा ५०० व १००० रुपयांच्या नोटा पुढे सरकवल्या जावू लागल्यामुळे अनेक ठिकाणी सुट्या पैशांची कमतरता निर्माण झालेली. यामुळे ग्राहक व दुकानदार यांच्यात वादाला सुरवात झाल्यामुळे अनेकांनी रात्रीपासूनच दोन्ही नोटा घ्यायचे बंद केले. याचीच संधी साधत काही मॉल व्यवस्थापनांनी मध्यरात्रीपर्यंत मॉल सुरू ठेवण्याचा निर्णय घेत, मोबाइलवर तसे मेसेज पाठवले. यामुळे केवळ स्वत:कडील नोटा संपवायच्या या उद्देशाने अनेकांना अनावश्यक खरेदीचा बेत ऐनवेळी आखावा लागला. तर बुधवारी एटीएम बंद राहणार असल्यामुळे प्रत्येक एटीएम सेंटरच्या बाहेर बँक ग्राहकांची रांग लागली होती. दोन दिवस वापराकरिता अनेकांनी २ ते ५ हजार रुपये काढून स्वत:जवळ ठेवले. परंतु एटीएममधून काढलेल्या नोटा देखील ५०० व १००० रुपयांच्याच असल्यामुळे घाईमध्ये पैसे काढणाऱ्यांचीही चांगलीच फसगत झाली होती. काही धनदांडग्यांकडे हजारो रुपये सोबत असूनही ते घेणारे कोणीच नसल्यामुळे १०० रुपयांसाठी त्यांनाही ठिकठिकाणी विनंत्या कराव्या लागल्या.नोटा रद्द झाल्यामुळे तसेच सुट्या पैशांची चणचण भासू लागल्यामुळे ग्राहकांची झालेली गैरसोय दूर करत आॅनलाइन शॉपिंगवाल्यांनीही कमाईची संधी साधली. आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यात नोटांमुळे अडचण येत असल्यास त्यांच्याकडून आॅनलाइन शॉपिंगकडे ग्राहकांना आकर्षित करून ई- वॉलेटचा पर्याय मांडला जात होता. (प्रतिनिधी)
आॅनलाइन शॉपिंगने साधली संधी
By admin | Published: November 10, 2016 3:43 AM