नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीयांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला. आयुक्तांच्या भूमिकेमुळे ऐरोलीतील बाबासाहेब आंबेडकर भवनच्या डोमवर मार्बल लावण्याचे काम रखडले असून, शैक्षणिक वर्ष संपत आले तरीही विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप झालेले नाही. याच्या निषेधार्थ ऐरोली व रबाळेतील नागरिकांनी केलेल्या आंदोलनात सर्वपक्षीयांनी सहभाग दर्शवला.मुंढे यांच्याविरोधात बुधवारी सीबीडी येथे निदर्शने करण्यात आली. ‘मुंढे हटाव शहर बचाव’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांसह सुमारे तीन हजार नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मागील काही दिवसांपासून महापौर सुधाकर सोनवणे व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत. ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनच्या डोमवर मार्बल बसवण्याच्या कामास आयुक्त मुंढे यांनी आयआयटीच्या अहवालाच्या आधारे नकार दिलेला आहे. आयुक्तांच्या या भूमिकेला विरोध दर्शवत महापौर सुधाकर सोनवणे यांनी राजीनाम्याचा इशारा दिला होता. शिवाय महासभेत आयुक्तांविरोधात अविश्वासाचा ठरावही मंजूर करून शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे; परंतु अद्याप त्यावर निर्णय होऊ शकलेला नाही. अशातच प्रभागातील पालिका शाळेतील मुख्याध्यापकांच्या बदली वरून महापौर व आयुक्तांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पेटली आहे. शिक्षण मंडळाचे सभापती असताना महापौरांनीच त्या मुख्याध्यापकांची नियमबाह्य नियुक्ती केल्याचे मुंढे यांनी यादवनगरमध्ये ‘वॉक विथ कमिशनर’ दरम्यान सांगितले होते; परंतु त्या मुख्याध्यापकांची नियुक्ती आपल्या कार्यकाळातली नसून मुंढे यांच्याकडून जाणीवपूर्वक आपली बदनामी केली जात असल्याचा आरोप महापौर सुधाकर सोनवणे यांनी केला आहे. यावरूनच प्रभाग १९ व २० मधील नागरिकांनी महापौरांच्या समर्थनार्थ आयुक्त मुंढे यांच्याविरोधात बुधवारी आंदोलन केले. त्यामध्ये पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. शैक्षणिक वर्ष संपत आले, तरीही शालेय साहित्यांचे वाटप झाले नसल्याचा निषेध पालकांनी नोंदवला.महापौरांच्या समर्थनार्थ प्रभागातील नागरिकांनी काढलेल्या या आंदोलनाला सर्वपक्षीयांनीही पाठिंबा दर्शवला. त्यानुसार आंदोलना वेळी महापौर सुधाकर सोनवणे, स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनंत सुतार, माजी उपमहापौर अशोक गावडे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, आरपीआय प्रदेश सरचिटणीस महेश खरे, जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ, नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह आंदोलनाचे प्रमुख राजू गायकवाड, दिगंबर इंदुलकर आदी उपस्थित होते.
मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीयांचा एल्गार
By admin | Published: February 11, 2017 4:27 AM