सिडकोच्या चायनामेड मेट्रो कोचला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:48 AM2017-07-24T06:48:07+5:302017-07-24T06:48:07+5:30

नागपूर रेल्वे प्रकल्पासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या चायनामेड मेट्रो कोचला विरोध होत असतानाच आता सिडकोच्या मेट्रो प्रकल्पात दाखल

Opposition to CIDCO's Chinamanamed Metro Coach | सिडकोच्या चायनामेड मेट्रो कोचला विरोध

सिडकोच्या चायनामेड मेट्रो कोचला विरोध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नागपूर रेल्वे प्रकल्पासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या चायनामेड मेट्रो कोचला विरोध होत असतानाच आता सिडकोच्या मेट्रो प्रकल्पात दाखल होणाऱ्या चिनी बनावटीच्या मेट्रो कोचलाही विरोध होवू लागला आहे. नवी मुंबईतील आवाज फाउंडेशन या सामाजिक संस्थेने सिडकोच्या या निर्णयाचा विरोध केला असून याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
चीन आणि भारताच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी युध्दाची शक्यता वर्तविली जात आहे. स्वदेशी जागरण मंचाने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपूर येथील मेट्रो प्रकल्पासाठी चिनी बनावटीच्या मेट्रो कोच खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कार्पोरेशनबरोबर करार केला आहे. प्रकल्पासाठी ८५१ कोटी रुपयांचे ६९ मेट्रो कोच चीनकडून विकत घेतले जाणार आहेत. नागपूरमध्ये विरोध होत असतानाच आपल्या महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल प्रकल्पासाठी सिडकोने चिनी बनावटीचे मेट्रो कोच खरेदी करण्याचा करार केला आहे.
बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतिपथावर आहे. या मार्गावर डिसेंबर २0१८ मध्ये प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू करण्याचा सिडकोचा मानस आहे. पहिल्या टप्यातील या मार्गासाठी आठ मेट्रोचे कोच खरेदी करण्यात आले आहेत. एका मेट्रोची किंमत ४0 कोटी रूपये इतकी असून आठ मेट्रोसाठी तब्बल ३२0 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. त्यातील दोन मेट्रो दोन महिन्यात ट्रायलसाठी सिडकोकडे हस्तांतरित होणार आहेत. त्यासंदर्भात एक सोहळा १९ ते २३ जुलै या काळात पार पडला. त्यासाठी सिडकोचे एक पथक चीनला रवाना झाले आहे. आवाज फाउंडेशनचे सेक्रेटरी राजीव मिश्रा यांनी सिडकोच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या कराराचा निषेध केला आहे. भारताचे मित्र असलेल्या जपान व कोरियाचे तंत्रज्ञान सर्वोत्तम आहे. चीनच्या तुलनेत येथील उत्पादने महाग असली तरी खात्रीदायक आहेत. सिडकोने चिनी कंपनीबरोबर केलेला मेट्रो कोच खरेदीचा करार ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी मिश्रा यांनी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी आणि कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील यांना संस्थेच्या वतीने निवेदन देवून भूमिका स्पष्ट करणार आहे.

नैना प्रकल्पातही चिनी कंपन्या उत्सुक
चीनच्या अनेक कंपन्यांनी सिडकोच्या नैना प्रकल्पातील पायाभूत सुविधांत गुंतवणूक करण्यासाठी उत्सुकता दर्शविली आहे.
चीनमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या चायना फॉरच्यून अ‍ॅण्ड डेव्हल्पमेंट लि. या कंपनीला नैना क्षेत्रात एक नवीन शहर वसविण्याचे स्वारस्य आहे.
काही महिन्यांपूर्वी या कंपनीने मुंबईत अशा आशयाचा सांमजस्य करारही केला आहे. त्यामुळे येत्या काळात नैना क्षेत्रातही चिनी कंपन्यांचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. असे असले तरी यासंदर्भात सिडकोची भूमिका अत्यंत सावध असल्याचे समजते.

Web Title: Opposition to CIDCO's Chinamanamed Metro Coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.