जेएनपीटी बंदराची खोली वाढवण्यास विरोध
By Admin | Published: January 24, 2017 05:56 AM2017-01-24T05:56:39+5:302017-01-24T05:56:39+5:30
जेएनपीटी बंदर अंतर्गत मुंबई हार्बर आणि जेएनपीटी बंदराच्या समुद्र चॅनेलची खोली वाढविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण
उरण : जेएनपीटी बंदर अंतर्गत मुंबई हार्बर आणि जेएनपीटी बंदराच्या समुद्र चॅनेलची खोली वाढविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी बैठक बोलावली होती. ही बैठक संतप्त प्रकल्पग्रस्तांनी उधळून लावली. अप्पर जिल्हाधिकारी किरण पाणगुडे यांच्या उपस्थितीत बैठकीत जनसुनावणी होणार होती. मात्र संतप्त सरपंच, सदस्य, ग्रामस्थ आणि मच्छिमारांपुढे अधिकाऱ्यांनी शरणागती पत्करली.जनसामान्यांच्या समुद्र चॅनेलची खोली वाढविण्याच्या कामाला ग्रामस्थांनीतीव्र विरोध केल्याने वरिष्ठांमार्फत अहवाल सरकारला तातडीने सादर करण्याचे आश्वासन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतरच ग्रामस्थांचा राग शांत झाला.
जेएनपीटी बंदराची उभारणी १९८९ करण्यात आली. तेव्हापासून बंदराच्या विकासाच्या नावाखाली आणखी दोन बंदरे खासगीकरणातून उभारण्यात आली आहेत. त्यानंतर बंदरातील सर्वाधिक लांबीचे तसेच क्षमतेचे चौथे बंदर उभारण्याच्या कामाला सुरुवात केली. विविध बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणात दगड मातीचे भराव केले आहेत. समुद्रात होत असलेल्या प्रचंड भरावामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढतच चालली आहे.
पंधरा मीटर्सपर्यंत समुद्र चॅनेलची खोली वाढविण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामामुळे आणि भरावाच्या कामामुळे समुद्राचे पाणी सागरी किनाऱ्यांचे उल्लंघन आणि किनाऱ्यावरील बांध बंधिस्ती संरक्षक तट उध्वस्त करीत बेटांवरील गावांच्या दिशेने सरकू लागले आहे. जेएनपीटीच्या कामामुळे पर्यावरणाची होत असलेल्या हानीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस. एच. पडवळ नवी मुंबई यांनी २३ जानेवारी २०१७ रोजी जनसुनावणी घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी जेएनपीटी कामगार वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहात जनसुनावणी घेण्यात आली. रायगड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित जनसुनावणीसाठी ए. डी. मोहेकर, उनप मुख्याधिकारी संदीप खोमणी आदी अधिकाऱ्यांबरोबरच विविध ग्रा. पं.चे सरपंच सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिला रणरागिणीही सहभागी झाल्या होत्या.
जनसुनावणीच्या प्रारंभापासूनच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जेएनपीटी आणि उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला. जेएनपीटी बंदरात होणारा दगड मातीचा भराव, समुद्री चॅनेलची खोली वाढविण्यासाठी केले जाणारे ब्लास्टिंक, समुद्रात सोडण्यात येणारे काळे तेल, वाढत्या प्रदूषणामुळे पारंपारिक मच्छिमारांवर आलेली उपासमारीची पाळी आणि सातत्याने होणाऱ्या भरावामुळे किनारपट्टीवरील गावागावात शिरणारे समुद्राचे पाणी याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल, जेएनपीटी बंदर अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बैठक उधळून लावली. ग्रामस्थांचे प्रश्न निकाली निघाल्याशिवाय प्रकल्पच होवू देणार नसल्याचा कडक इशाराही संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी यावेळी दिला. (वार्ताहर)