दिव्यांगांचा महापालिकेवर मोर्चा, निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 02:21 AM2019-01-12T02:21:03+5:302019-01-12T02:21:34+5:30
धोरणांवर नाराजी : निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
नवी मुंबई : शहरातील दिव्यांग नागरिकांच्या विविध समस्यांवर महापालिका प्रशासन कार्यवाही करीत नसून दिव्यांग व्यक्तींना स्टॉल देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्यावतीने शुक्र वारी ११ जानेवारी रोजी महापालिका मुख्यालयात मोर्चा काढण्यात आला होता. २६ जानेवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
नवी मुंबई शहरात दिव्यांग व्यक्तींना महापालिकेच्या माध्यमातून स्टॉल देण्यात आले आहेत. शहरात महापालिकेच्या माध्यमातून ४00 स्टॉल देणे गरजेचे असताना फक्त १७0 स्टॉलचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे इतर दिव्यांग व्यक्तींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून महापालिका प्रशासनाच्या वतीने स्टॉल देण्याबाबत वारंवार फक्त आश्वासन देण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच १५ आॅक्टोबर रोजी महापालिका आयुक्तांची दिव्यांग व्यक्तींनी भेट घेऊन विविध समस्या मांडल्या होत्या. त्या वेळी आयुक्तांनी तीन महिन्यांत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते, परंतु या समस्या सोडविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. येत्या सात दिवसांत प्रशासनाने प्रश्न न सोडविल्यास २६ जानेवारी रोजी आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला.