अलिबाग : मुंबईतील शिवडी बंदर परिसरात असणारा सुमारे ७० हजार टन कोळसा आता रायगडच्या माथी मारण्यात येत आहे. महाजेनकोचा हा कोळसा अलिबाग तालुक्यातील धरमतर जेट्टीवर उतरविण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी प्रखर विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन शहाबाज येथील शेतकरी द्वारकानाथ पाटील आणि दर्शन जुईकर यांनी नुकतेच जिल्हा प्रशासनाला दिले.मुंबई उच्च न्यायालयातील एका प्रकरणातील जनहित याचिकेमधील शिवडी येथील हाजी बंदर परिसरात उघड्यावर लाखो टन कोळसा ठेवण्यात आला आहे. या कोळशाच्या साठ्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. त्यामुळे येथील कोळशाचा साठा अन्यत्र हलविण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. महाजेनको आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांनी हा कोळसा धरमतर जेट्टीवर हलविण्यात येणार असल्याचे न्यायालयात स्पष्ट केले.हजारो टन कोळशामुळे मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोचणार असल्याने तो घरमतर येथे हलविण्यात येणार आहे. परंतु धरमतर जेट्टीपासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर शहाबाज हे गाव लागूनच आहे. मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याला होणारी हानी धरमतर परिसरातील नागरिकांनाही होणारच आहे. त्यामुळे हा कोळसा धरमतर बंदरावर उतरविण्याला विरोध असल्याचे द्वारकानाथ पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शहाबाजमध्ये ७०५ कुटुंबे राहतात, ज्यांची लोकसंख्या सुमारे साडेचार हजारांच्या घरात आहे. शहाबज, वडखळ, पोयनाड, पेझारी, तीनविरा, कामार्ले, धसवड, चरी, आंबेपूर, कुडूर्स, श्रीगाव, वाघाडे यासह अन्य गावांतील शेती आणि नागरिकांचे आरोग्यही या कोळाशामुळे धोक्यात येणार असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय महाजेनकोचा कोळसा धरमतर बंदरावर उतरवू देण्यास सक्त विरोध असल्याचे पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांची बाजू जिल्हाधिकारी यांनी मांडावी. यासाठी विधी व न्याय विभागाकडे याबाबतचा तत्काळ अहवाल पाठवावा, अशी विनंती निवेदनात केली आहे. प्रलंबित जनहित याचिकेमध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल करणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
रायगडात कोळसा उतरवण्यास विरोध
By admin | Published: January 26, 2016 2:04 AM